कोलकाता, आयपीएल 2019 : डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी सनरायझर्स हैदराबादला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना कोलाकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांना हतबल केले. वॉर्नरला पाचव्या षटकात दिलेले जीवदान कोलकाताला महागात पडले. 13व्या षटकात अखेर कोलकाताला पहिले यश मिळाले, पियुष चावलाने हैदराबादच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोला त्रिफळाचीत केले आणि डेव्हिड वॉर्नरसोबतची 118 धावांची भागीदारी संपुष्टात आणली.
केन विलियम्सनला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावे लागले आणि भुनेश्वर कुमारकडे नेतृत्वाची धुरा आली. कोलकाताने नाणेफेकीचा कौल जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. चेंडु कुरतडण्याप्रकरणी एका वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या वॉर्नरने कोलकाताच्या गोलंदाजांची धुलाई केली. वॉर्नरने 31 चेंडूंत अर्धशतक केले. त्याला जॉनी बेअरस्टोने उत्तम साथ दिली. त्याने 35 चेंडूंत 39 धावा केल्या, परंतु त्याला 13व्या षटकात पियुष चावलाने बाद केले.
वॉर्नर मात्र एका बाजूने फटकेबाजी करत होता. त्यानं 31 चेंडूंत 53 धावा करताना आपल्या नावावर दोन विक्रमांची नोंद केली. कोलकाताविरुद्ध 700 पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला. शिवाय आयपीएलमध्ये सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांचा विक्रमही त्यानं नावावर केला. वॉर्नरने 40 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहलीनं 38 वेळा अशी कामगिरी केली आहे. या क्रमवारीत गौतम गंभीर व सुरेश रैना ( 36), रोहित शर्मा ( 35) आणि शिखर धवन ( 32) मागोमाग आहेत.
Web Title: IPL 2019: David Warner's record comeback, two steps ahead of virat Kohli in most 50+ score in IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.