नवी दिल्ली, आयपीएल 2019 : गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावताना दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. इशांत शर्मा व अमित मिश्रा यांनी राजस्थान रॉयल्सचे कंबरडे मोडले आणि त्यांना निर्धारित 20 षटकांत 9 बाद 115 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. राजस्थानचा रियान पराग ( 50) एकटा लढला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचीही तारांबळ उडाली. इश सोढीनं त्यांना धक्क्यांवर धक्के दिले. पण, रिषभ पंतने चिवट खेळ करताना दिल्लीचा विजय पक्का केला. पंतने 38 चेंडूंत 2 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 53 धावा केल्या.
इशांत शर्मा ( 3/38) आणि अमित मिश्रा ( 3/17) यांनी दिलेल्या धक्क्यातून राजस्थान रॉयल्सला सावरता आले नाही. प्ले ऑफ शर्यतीत आव्हान कायम राखण्यासाठीच्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांना अपयश आले. रियान पराग वगळता राजस्थानच्या एकाही फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांसमोर टिकता आले नाही. राजस्थानने 116 धावांचे माफक लक्ष्य दिल्लीसमोर ठेवले. परागने अर्धशतकी खेळी केली. परागने 47 चेंडूंत 50 धावा करून आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा मान पटकावला. परागने 17 वर्ष 178 दिवस असताना अर्धशतक झळकावले. त्याने संजू सॅमसनचा 18 वर्ष 169 दिवसांचा विक्रम मोडला. पराग 49 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 50 धावा केल्या. ट्रेंट बोल्टने ( 2/27) दोन विकेट घेतल्या.