मुंबई, आयपीएल 2019 : दिल्लीच्या २१३ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी चांगली फटकेबाजी केली. पण त्यांना मोठ्या खेळी साकारता आल्या नाहीत. मुंबईच्या संघात आलेल्या युवराज सिंगने मात्र दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत मुंबईचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण युवराजची ही झुंज अपयशीच ठरली आणि मुंबईला दिल्लीकडून ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला. युवराजने ३५ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. मुंबईचा पहिला सामना घरच्याच मैदानावर होता आणि या लढतीत पराभव पत्करावा लागला.
दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतची तुफानी खेळी वानखेडेवर पाहायला मिळाली. पंतने फक्त २६ चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७७ धावांची खेळी साकारली. पंतच्या या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २१३ धावा करता आल्या.