कोलकाता, आयपीएल २०१९ : दमदार सुरुवातीनंतर दिल्ली कॅपिटल्सची घसरगुंडी पाहायला मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या मधल्याफळीला वेसण घालण्याचे काम चोख बजावले. त्यामुळे दिल्लीला अपेक्षित धावसंख्या उभारता येणार नाही, असे वाटत होते. पण शेरफेन रदरफोर्डने अखेरच्या षटकांमध्ये जोरादार फटकेबाजी केली, त्यामुळेच दिल्लीला आरसीबीपुढे १८८ धावांचे आव्हान ठेवता आले. रदरफोर्डने १३ चेंडूंत नाबाद २८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण पृथ्वीला मोठी खेळी साकारता आली नाही. पृथ्वीला १८ धावांवर समाधान मानावे लागले.
पृथ्वी बाद झाल्यावर धवन आणि श्रेयस अय्यर यांची चांगलीच जोडी जमली. या दोघांनीही आपली अर्धशतके झळकावली. पण हे दोघेही अर्धशतक झळकावल्यावर लगेचच बाद झाले. धवनने ३७ चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५० धावा केल्या. श्रेयसने ३७ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५२ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर दिल्लीचा डाव गडगडला. रिषभ पंत, कॉलिन इनग्राम यांना जास्त धावा काढता आल्या नाहीत.