बंगळुरू, आयपीएल 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या दमदार फटकेबाजीनंतरही चेन्नई सुपर किंग्सला रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध एका धावेने पराभव पत्करावा लागला. ड्वेन ब्राव्हो नॉन स्ट्रायकर एंडला असताना धोनीनं तीन एकेरी धावा घेण्यास नकार दिल्या आणि स्ट्राईक आपल्याकडेच राखली होती. धोनीनं तसं केलं नसतं तर कदाचित सामन्याचा निकाल चेन्नईच्या बाजूनं लागला असता, असे अनेकांचे मत आहे. पण, असं करण्यामागे कारण होते आणि सामन्यानंतर धोनीनं त्याचा खुलासा केला.
बंगळुरूच्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनीनं 19 व्या षटकात तीन एकेरी धाव घेण्यास नकार दिला. चेन्नईला अखेरच्या 2 षटकांत 36 धावांची आवश्यकता होती. अखेरच्या षटकात 26 धावा हव्या असताना धोनीनं धोनीनं अनुभव पणाला लावला. त्याने तीन षटकार, 1 चौकार आणि 2 धावा घेत सामन्यात थरार आणला. 1 चेंडू दोन धावा आवश्यक असताना धोनीचा फटका हुकला आणि बंगळूरूच्या पार्थिव पटेलने योग्य वेळी अचूक निशाणा साधला. धोनीनं 175च्या स्ट्राईक रेटनं 48 चेंडूंत 7 षटकार व 5 चौकारांसह नाबाद 84 धावांची खेळी केली.
त्याने 19व्या षटकात युवा गोलंदाज नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर तीन एकेरी धावा घेण्यास नकार दिला. नॉन स्ट्राइक एंडला ब्राव्होसारखा अनुभवी खेळाडू असतानाही धोनीच्या या निर्णयावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. पण, धोनीनं यामागचे कारण सांगितले. तो म्हणाला,''डेथ ओव्हरमध्ये फलंदाजी करणे अवघड होते. चेंडू बॅटवर येत नव्हता. त्यामुळे नवीन फलंदाज स्ट्राइकवर आला असता, तर त्याला संघर्ष करावा लागला असता. या सामन्यात मी चांगला स्थिरावलो होतो आणि त्यामुळे हा धोका मी पत्करू शकत होतो. संघालाही अनेक धावांची गरज होती. 10-12 चेंडूंत आम्हाला जवळपास 36 धावा हव्या होत्या. त्यामुळे चौकारांची आतषबाजी करावी लागणार होती. त्यामुळे पराभवानंतर तुम्ही एक-दोन धावांचा हिशोब करत आहात. पण, त्याचवेळी मी स्ट्राईक दिली असती आणि काही चेंडू निर्धाव राहिले असते तर. त्याच निर्धाव चेंडूत मला चौकार लगावता आले असते, असा विचार केला गेला असता.''
चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनेही धोनीच्या त्या निर्णयाला पाठींबा दिला.