जयपूर, आयपीएल 2019 : श्रेयस गोपाळच्या उल्लेखनीय गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या सत्रात पहिल्या विजयाची चव चाखली. राजस्थानने घरच्या प्रेक्षकांसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सात विकेट राखून विजय मिळवला. गोपाळने 4 षटकांत 13 धावांत तीन फलंदाज बाद केले. यात बंगळुरूचा विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या प्रमुख फलंदाजांचा समावेश होता. कोहलीची दांडी गुल होताच गोपळ स्वतः अवाक् झाला होता. बंगळुरूला 20 षटकांत 4 बाद 158 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 19.5 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले.
गोपाळचा खास विक्रम कोहली आणि डिव्हिलियर्स यांना बाद करताच गोपाळने आशीष नेहराच्या एका खास विक्रमाच्या पंक्तीत स्थान पटकावले. आयपीएलमध्ये कोहली आणि डिव्हिलियर्स हे एकाच गोलंदाजांकडून बाद होण्याचा हा 19वा प्रसंग आहे. पण, अशी कामगिरी दोन वेळा करणारा गोपाळ हा नेहरानंतर दुसरा गोलंदाज ठरला आहे.
गोपाळने यापूर्वी 2008 साली कोहली व डिव्हिलियर्स यांना एकाच सामन्यात बाद केले होते. या दोघांविरुद्ध गोपाळची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. गोपाळने 3 डावांत 35 चेंडूंत 34 धावा दिल्या आहेत आणि त्यात 17 निर्धाव चेंडूंचा समावेश असून त्याने पाचवेळा बाद केले आहे.
बंगळुरुविरुद्ध गोपाळची गोलंदाजी नेहमीच बहरली आहे. त्याने तीन सामन्यांत 5.6 च्या सरासरीने आणि 4.2 च्या इकॉनमी रेटने 12 विकेट घेतल्या आहेत. गोपाळने आतापर्यंत तीनवेळा डिव्हिलियर्सला बाद केले आहे, तर कोहलीला दोन वेळा. गोपाळ म्हणाला,''मी स्वतःला भाग्यवान समजतो. कोहली आणि डिव्हिलियर्स हे जगातील सर्वोत्तम फलंदाज आहेत आणि त्यांची विकेट घेण्यात मला यश मिळाले.''
पाहा व्हिडीओ..
https://www.iplt20.com/video/160750
https://www.iplt20.com/video/161131/m14-rr-vs-rcb-match-highlights?tagNames=indian-premier-league