मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या जेतेपदात गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय संघाचा बॅकबोन असलेल्या बुमराहने गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो भारताचा ट्रम्प कार्ड ठरणार आहे. बुमराहच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचे कौतुक केले. याच दिग्गजांमध्ये रविवारी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची भर पडली आहे. आता क्रिकेटच्या देवानंच कौतुक केल्याबरोबर बुमराहला आपल्या भावना आवरणे कठीण झाले.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका अशा देशांत आपलं नाणं खणखणीत वाजवणारा बुमराह आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याने सर्वांच्या अपेक्षांवर खरे उतरताना 16 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या. शिवाय प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या धावांवर लगामही लगावला. मुंबई इंडियन्सने रविवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला अवघ्या एका धावेने नमवले. 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सहज विजय मिळवेल असे वाटले होते, परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. लसिथ मलिंगाच्या अखेरच्या षटकाने चेन्नईचा तोंडचा घास पळवला.
या सामन्यात बुमराहला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने चार षटकांत 14 धावांत दोन गडी बाद केले. यात अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्राव्हो या प्रमुख फलंदाजांची विकेट होत्या. त्यामुळे त्याचे या जेतेपदासाठीचे योगदान दुर्लक्षित करून चालणारे नाही. मुंबई इंडियन्सचा मेंटॉर तेंडुलकरनेही बुमराहचे कौतुक केले. बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे मत तेंडुलकरने व्यक्त केले.
आता क्रिकेटच्या देवानेच कौतुक केल्याने बुमराह भावनिक झाला होता. यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्याला सुचत नव्हते.