मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 2019 च्या हंगामाच्या वेळापत्रकाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. हे वेळापत्रक सोमवारी जाहीर होणे अपेक्षित होते, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम 23 मार्चपासून सुरू होणार आहे, परंतु निवडणुकांमुळे स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. याआधी मिळालेल्या माहितीनुसार हे वेळापत्रक 4 फेब्रुवारीला जाहीर होणार होते.
''निवडणूक आयोगाशी आमची चर्चा सुरू आहे आणि अधिकाऱ्यांनीही या स्पर्धेबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात वेळापत्रक जाहीर करण्यात येईल,'' अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली. निवडणूक असल्यामुळे आयपीएल भारतात खेळणे अवघड असल्याचे म्हटले जात आहे. कारण सुरक्षा यंत्रणा आयपीएलपेक्षा निवडणुकीलाच प्राधान्य देणार आहे. दुसरीकडे आयपीएलच्या तारखा बदलता येऊ शकत नाहीत. कारण एखाद्या स्पर्धेनंतर दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळताना 15 दिवसांचा किमान अवधी असणे आयसीसीच्या नियमानुसार गरजेचे आहे. त्यामुळे आयपीएलची तारीख बदलता येणे शक्य नाही.