जयपूर : राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघ आयपीएलमध्ये शनिवारी आमने- सामने येणार असून दोन्ही संघातील महत्त्वाचे विदेशी खेळाडू मैदानावर दिसणार नाहीत.सध्या राजस्थान संघाला हैदराबादच्या तुलनेत अधिक फटका बसला. संघातील बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर हे विश्वचषकासाठी इंग्लंडला परत गेले.
हैदराबादला इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जॉनी बेयरेस्टो याची उणीव जाणवणार आहे. यानंतर राजास्थानचा प्रमुख खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच आठवड्यात आॅस्ट्रेलियाला परत जातील. हैदराबादने दहापैकी पाच सामने जिंकले, तर राजस्थानने ११ पैकी केवळ चारच सामने जिंकले आहेत. अष्टपैलू आर्चरने गुरुवारी केकेआरवरील रोमहर्षक विजयात मोलाची भूमिका बजावली होती. इंग्लंडच्या तिन्ही खेळाडूंची राजस्थानला उणिव जाणवणार असली तरी अजिंक्य रहाणे आणि स्टीव्ह स्मिथ हे फॉर्ममध्ये असलेले खेळाडू संघाची ताकद आहेत. राजस्थानसाठी आसामचा १७ वर्षांचा रियान पराग याने फलंदाजी आणि गोलंदाजीत यंदा चमक दाखविली. केकेआरविरुद्ध त्याने ३१ चेंडूत ४७ धावा केल्या होत्या. संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी यांनी मोलाचे योगदान दिले असून टर्नर आणि लियॉन लिव्हिंगस्टोन यांना अद्याप सूर गवसलेला नाही.
गोलंदाजीत आर्चर, वरुण अॅरोन ओशने थॉमस, धवल कुलकर्णी आणि जयदेव उनाडकट यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हैदराबाद संघाकडून वॉर्नर २९ एप्रिल रोजी यंदा अखेरचा आयपीएल सामना खेळेल. त्याचे स्थान नंतर मार्टिन गुप्तिल घेऊ शकतो. (वृत्तसंस्था)
Web Title: IPL 2019: Foreign players without Rajasthan, Hyderabad face to face
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.