बंगळुरू, आयपीएल 2019 : भारतीय क्रिकेट संघात जसप्रीत बुमराहने आपले स्थान अढळ केले आहे. गोलंदाजी करण्याच्या त्याच्या अपरंपरागत शैलीनं जागतिक क्रिकेटमध्ये दरारा निर्माण केला आहे. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये बुमराह टिच्चून मारा करतो आणि सध्याच्या घडीला तो भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. मागील काही वर्षांत युवा खेळाडूंमध्ये बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक युवक त्याच्या शैलीची कॉपी करताना पाहायला मिळाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातही मंगळवारी असेच चित्र पाहायला मिळाले. गुरुवारी होणाऱ्या लढतीत बुमराहचा सामना करण्यासाठी बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीनं आखलेल्या स्ट्रॅटेजीचा हा एक भाग म्हणावा लागेल.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत दुखातपग्रस्त झालेला बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो गुरुवारी बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे. बुमराहच्या तंदुरुस्त होण्यामुळे मुंबई इंडियन्सची बाजू भक्कम झाली आहे. त्यात लसिथ मलिंगाही मुंबईच्या चमूत परतणार असल्यामुळे बंगळुरूच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र, कॅप्टन कोहलीनं त्यावर तोडगा शोधला आहे. बुमराहच्या अॅक्शनसारखी गोलंदाजी करणारा खेळाडू कोहलीनं सरावासाठी मागवला आहे. बुधवारी बंगळुरुच्या फलंदाज मोईन अलीनं त्या गोलंदाजासोबत नेटमध्ये कसून सराव केला.
याआधीही हाँगकाँगच्या 13 वर्षांखालील क्रिकेट लीगमध्ये एक गोलंदाज बुमराहसारखी गोलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता त्यावेळीही बुमराहची कॉपी करणारा गोलंदाज दिसला होता. बुमराहनं आयपीएलमध्ये 62 सामन्यांत 64 विकेट्स घेतल्या आहेत. गत मोसमात त्यानं 6.88च्या इकोनॉमीनं 14 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या होत्या.