चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या पर्वात प्ले ऑफमध्ये प्रथम प्रवेश करण्याचा मान चेन्नई सुपर किंग्सने पटकावला. मंगळवारी घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने माजी विजेत्या सनरायझर्स हैदराबादवर 6 विकेट राखून विजय मिळवला. 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला अखेरच्या षटकापर्यंत खेळावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध आलेला अनुभव याही लढतीत येतो की काय असे वाटत होते. पण चेन्नईने विजय मिळवला.
शेन वॉटसन (96) आणि सुरेश रैना ( 38) धावांच्या जोरावर चेन्नईने बाजी मारली. या विजयानंतर चेन्नईच्या खात्यात 16 गुण झाले आहेत आणि त्यांनी प्ले ऑफचा प्रवेश पक्का केला आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या यशस्वी वाटचालीचे श्रेय गोलंदाजांना दिले. पण त्याने एक गुपित मनात दडवून ठेवल्याचे सांगितले आणि ते जाणून घेण्यासाठी निवृत्तीपर्यंत वाट पाहण्याचे संकेतही दिले. ते गुपित सांगितल्यास CSK मला खरेदी करणार नाही, असेही धोनी म्हणाला.
केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत फलंदाजीत बढती मिळालेल्या मनिष पांडेने संधीचं सोनं केलं. त्यानं डेव्हिड वॉर्नरच्या सोबतीनं शतकी भागीदारी करताना हैदराबादला मजबूत धावसंख्या उभारून दिली. वॉर्नरने आयपीएलमधील 43वे अर्धशतक पूर्ण केले, तर पांडेने नाबाद 83 धावा केल्या. हैदराबादने चेन्नईसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. पांडेने 49 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 83 धावा करत संघाला 3 बाद 175 धावांपर्यंत मजल मारून दिली.
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने थोडी सावधच सुरुवात केली. मात्र, तिसऱ्याच षटकात त्यांना धक्का बसला. सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस (1) धावबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर वॉटसन आणि रैना यांनी चेन्नईच्या डावाला आकार दिला. वॉटसनने 53 चेंडूंत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 96 धावा केल्या. वॉटसनला आयपीएलमधल्या पाचव्या शतकाने हुलकावणी दिली. पण चेन्नईने सामना जिंकला.
या सामन्यानंतर धोनी म्हणाला," या हंगामात आमच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्यामागचं हे एक गुपित आहे. आमचे चाहते आणि साहाय्यक सदस्य यांना यशाचे श्रेय द्यायला हवे. आणखी एक गुपित आहे, परंतु निवृत्त होइपर्यंत ते मी सांगणार नाही. आता सांगितले तर CSK मला लिलावात खरेदी करणार नाही."
Web Title: IPL 2019 : If I tell the secret of reaching play-offs, Chennai won’t buy me at the auction- MS Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.