मुंबई, आयपीएल 2019 : क्रिकेट विश्वामध्ये विराट कोहलीचा चांगलाच दबदबा आहे. सध्याच्या घडीला विराट जगातील अव्वल फलंदाज आणि कर्णधार असल्याचे म्हटले जात आहे. पण भारताचा एक खेळाडू कोहलीची बरोबरी करू शकतो, असे धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला वाटत आहे.
भारतामध्ये गुणवत्तेची खाण आहे, असे म्हटले जाते. विराटबरोबर खेळणाऱ्या रोहित शर्माचीही स्तुती केली जाते. त्याचबरोबर पृथ्वी शॉ हा दुसरा सचिन तेंडुलकर आहे, असेही काही जणांनी म्हटले आहे. पण या दोन्ही खेळाडूंचे नाव गेलने घेतलेले नाही. गेलने यावेळी विराटशी बरोबरी करणारा खेळाडू लोकेश राहुल असल्याचे सांगितले आहे.
याबाबत गेल म्हणाला की, " लोकेश राहुल हा एक गुणवान खेळाडू आहे. जर त्यांने अजून काही गोष्टींवर मेहनत घेतली तर तो एक चांगला फलंदाज आणि कर्णधारही होऊ शकतो. त्याचबरोबर तो विराट कोहलीशी बरोबरीही करू शकतो. "
गेल पुढे म्हणाला की, " राहुलला ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये त्याने महिलांच्या विरोधी वक्तव्य केले होते. हे वक्तव्य त्याला चांगलेच भोगले. कारण बीसीसीआयने त्याच्यावर काही काळासाठी बंदीही घातली होती. आता या प्रकरणातून राहुल बाहेर पडला आहे. आता त्याने जुने सारे काही विसरायला हवे आणि खेळावर लक्ष केंद्रीत करायला हवे. जर राहुलने खेळावर लक्ष केंद्रीत केले तर त्याच्यासारखा खेळाडू होणे नाही."
डेव्हिड वॉर्नरची भन्नाट खेळी आणि गोलंदाजांच्या चांगल्या माऱ्यामुळे सनरायर्स हैदराबादला किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवता आला. या विजयासह हैदराबादचे 12 गुण झाले आहेत. हैदराबादने हा सामना 45 धावांनी जिंकला. लोकेश राहुलने पंजाबचा एकहाती किल्ला लढवला, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. राहुलने 56 चेंडूंत 79 धावांची खेळी साकारली. या सामन्यात राहुलने दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला. पण राहुलला अन्य खेळाडूंकडून चांगली साथ मिळाली नाही.