मुंबई, आयपीएल 2019 : विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करताना आयपीएलमधील कामगिरी ग्राह्य धरली जाणार नाही, असे सुतोवाच भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले होते. भारताचा उपकर्णधार रोहित शर्मानेही या मताला दुजोरा दिला होता. पण भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांना मात्र असे वाटत नाही. कारण विश्वचषकासाठी संघाची निवड करताना आयपीएलच्या कामगिरीचा विचार करायला हवा, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.
भारताला आतापर्यंत चौथ्या क्रमांकाचा तिढा सोडवता आलेला नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांच्या नावाचा विचार केला गेला. काहीवेळा महेंद्रसिंग धोनीलाही चौथ्या क्रमांकावर पाठवले गेले. पण चौथ्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजाला कायम ठेवायचे, हे अजूनही निश्चित झालेले नाही. त्यामुळे या चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजाचा विचार करायचा असेल तर त्यासाठी आयपीएलच्या कामगिरीचा आधार घ्यावा, असे गावस्कर यांनी सांगितले आहे.
याबाबत गावस्कर म्हणाले की, " चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज फिट बसू शकतो, यावर अजूनही चर्चा सुरु आहे. रायुडूला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. पण त्याला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे सध्याच्या घडीला लोकेश राहुल हा चांगल्या फॉर्मात आहे. वर्षभरापूर्वी त्याच्याकडून चांगली कामगिरी होत नव्हती. पण यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र त्याच्याकडून चांगली कामगिरी होत आहे. विराट कोहलीसारखेच त्याच्या फलंदाजीमध्येही सातत्य आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर राहुल हा फिट बसू शकतो. "
आयपीएलच्या कामगिरीवर विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पाहू नका - विराट कोहली
‘आयपीएलमधील कामगिरी विश्वचषक संघाच्या निवडीसाठी उपयुक्त ठरेल, असा कुणी समज करून घेऊ नये. असे कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असेल,’ असे कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहली म्हणाला, ‘आयपीएलच्या कामगिरीचा विश्वचषकावर काही प्रभाव पडेल, असे वाटत नाही. विश्वचषकासाठी निवड करताना आयपीएलची कामगिरी विचारात घेतली जाणार नाही, असे माझे मत आहे. आम्हाला तगडा संघ हवा आहे. विश्वचषकाला सामोरे जाण्याआधी अखेरच्या दोन स्थानासाठी खेळाडूंचा शोध घेऊ. ऋषभ पंतला काही सामने खेळण्याची संधी दिली जाईल, पण एक गोलंदाज कमी खेळविण्याच्या अटीवर असे करणार नाही. संघ नियोजनाचा देखील विचार केला जाईल. संघाचा ताळमेळ कायम राखून ज्यांना संधी द्यायची आहे, त्यांना खेळविता येईल.’