मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगचा 12वा हंगाम भारतातच होणार असल्याची मोठी घोषणा मंगळवारी केली. निवडणुकामुळे आयपीएलचा हा हंगाम भारताबाहेर जाणार असल्याची चर्चा होती. पण, आता ही स्पर्धा 23 मार्चपासून भारतातच होणार आहे, परंतु याच कालावधीत लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक फ्रँचायझींना केवळ तीनच सामने घरच्या मैदानावर खेळता येणार आहेत. अन्य सामने त्रयस्थ ठिकाणी होतील.
निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत आणि त्यामुळे बीसीसीआयनेही आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. 2 किंवा 3 फेब्रुवारीला हे वेळापत्रक जाहीर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीच्या दरम्यान सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो आणि त्याचा अंदाज घेत बीसीसीआय त्रयस्थ ठिकाणांची निवड करणार आहे. बीसीसीआय 5-6 त्रयस्थ ठिकाण निवडणार आहेत आणि अशा परिस्थितीत होम-अवे सामने होणार नाहीत.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,''सर्व सामन्यांना सुरक्षा मिळावी हे आमचे प्रमुख प्राधान्य आहे. केंद्र सरकारने याआधीच्या दोन निवडणूकांत सुरक्षा पुरवण्यास इन्कार केला होता. आयपीएल स्पर्धा भारतातच खेळवणे हे आमचे पहिले ध्येय होते. निवडणुका टप्प्यात झाल्या तर बीसीसीआय आणि राज्य सरकार यांना स्पर्धा आयोजन करण्यास काहीच अडचण होणार नाही.''