जयपूर, आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात कोण जिंकल यापेक्षा आर अश्विननं घेतलेली विकेट चर्चेत राहिली. अश्विनने 'मंकड्स' नियमानुसार राजस्थानच्या जोस बटलरला धावबाद केले आणि त्यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. या विकेटने राजस्थानच्या हातातून विजय निसटला आणि पंजाबने 14 धावांनी विजय मिळवला. राजस्थानने बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर राजस्थानचा डोलारा कोसळला. मोठे फटके मारण्याच्या नादात राजस्थानच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स फेकल्या आणि पराभव ओढवून घेतला.
बटलर धडाकेबाज फलंदाजी करत होता. पण त्याला अश्विनने ज्याप्रकारे आऊट केले, तो या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच बटलरने क्रीझ सोडले होते. हे अश्विनच्या लक्षात आले आणि त्याने चेंडू न टाकता बटलरला रनआऊट केले. यावेळी बटलर आणि अश्विन यांच्यामध्ये वाद झाला. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हे प्रकरण सुपूर्द केले. तिसऱ्या पंचांनी यावेळी बटलर बाद झाल्याचा निर्णय. अश्विनच्या या कृतीची माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निंदा करत आहेत. पण, अश्विननं आपण काहीच चुकीचं केलं नसल्याची प्रतिक्रिया दिली.
13व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हा प्रकार घडला. अश्विननं गोलंदाजीसाठी स्टम्प जवळ येईपर्यंत बटलरने क्रीझ सोडली नव्हती. पण, त्यानंतर अश्विनने पाय मागे घेत त्याला धावबाद केले. अश्विनने त्याच्या या कृत्याचे समर्थन केले. तो म्हणाला,''हे ठरवून केले नव्हते. जे नियमात आहे तेच मी केले. त्यामुळे येथे खिलाडू वृत्ती कुठून आली, हेच कळेनासे झाले आहे. जे नियमात आहे तेच मी केले.''