मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. दिल्लीच्या 213 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संपूर्ण संघ 176 धावांवर माघारी परतला. पण, या पराभवापेक्षा मुंबईच्या गोटात चिंता वाढवणारी घटना रविवारी घडली. मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्यामुळे त्याच्या वर्ल्ड कप खेळण्याबाबतची प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण, सामन्यानंतर बुमराह दुखापतीतून सावरल्याची माहिती मुंबई इंडियन्सने दिली.सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने सांगितले की,''क्षेत्ररक्षण करताना जसप्रीत बुमराहच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. पण, तो त्यातुन सावरत आहे आणि सोमवारीही त्याच्या तंदुरूस्तीची चाचणी केली जाईल. याबाबत पुढील माहिती लवकरच देण्यात येईल.''बुमराहची दुखापत भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहिमेलाही धोका पोहचवू शकते. अवघ्या दोन महिन्यांवर वर्ल्ड कप स्पर्धा आली आहे. बुमराहच्या दुखापतीची सोमवारी चाचणी करण्यात येईल आणि वैद्यकिय अहवाल येईपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि भारतीय संघ व्यवस्थापनात चिंतेचे वातावरण आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या अखेरच्या चेंडूवर बुमराहला ही दुखापत झाली. चेंडू अडवण्यासाठी बुमराहने डाईव्ह मारली. त्यावेळी खांद्याच्या दुखापतीमुळे बुमराह कळवळला. संघाचे फिजीओ नितीन पटेल यांनी लगेच मैदानावर धाव घेतली आणि बुमराहवर प्राथमिक उपचार केले. गतवर्षी बुमराहला आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाली होती. त्यावेळी त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते. दरम्यान, मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये 2013पासून सुरू असलेली परंपरा कायम राखली. 2013पासून मुंबईला सलामीच्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. 2019च्या मोसमातील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 37 धावांनी विजय मिळवत मुंबईची पराभवाची परंपरा कायम राखण्यात हातभार लावला. या विजयासह मुंबईला सर्वाधिक 12वेळा पराभूत करण्याचा विक्रमही दिल्लीनं नावावर केला. हा सामना पाहण्यासाठी युवीची पत्नी हेझल किच, रोहित पत्नी आणि कन्या रितिका व समायला आणि झहीर खानची पत्नी सागरिका याही उपस्थित होत्या.