मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमधील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला झालेल्या दुखापतीनं भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या अखेरच्या षटकात बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली आणि तो मैदानावर कळवळत होता. डावाच्या अखेरच्या चेंडूवर दिल्लीच्या रिषभ पंतने मारलेला फटका झेलण्यासाठी बुमराहने डाईव्ह मारली आणि खांद्याला दुखापत करून घेतली. प्राथमिक उपचारानंतर बुमराह डगआऊटमध्ये गेला, परंतु तो फलंदाजीला आला नाही.
बुमराहच्या खांद्याच्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट चाहते तणावात होते. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने बुमराहचे फिट राहणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेतही मुंबई इंडियन्सकडून बुमराहच्या दुखापतीबाबत फार काही सांगण्यात आले नव्हते. त्यात मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे आणि त्यासाठी मुंबईचा संघ रवाना झाला, परंतु बुमराहचे जाणे लांबणीवर ढकलण्यात आले. सोमवारी बुमराहच्या खांद्याचे स्कॅनिंग करण्यात आले आणि मंगळवारी तो बंगळुरूत दाखल होईल.
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला. रिषभ पंतच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 213 धावा चोपल्या आणि मुंबई इंडियन्सवर 37 धावांनी विजय मिळवला. पंतने 27 चेंडूंत 78 धावांची धमाकेदार खेळी केली. पंतने या खेळीत 7 चौकार व 7 षटकारांची आतषबाजी केली. मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या युवीनेही पहिल्याच सामन्यात 53 धावांची खेळी केली. पण, त्याला अन्य फलंदाजांकडून साजेशी साथ मिळाली नाही.
दरम्यान, मलिंगा नसल्याचा फटका पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला बसला. संघात अनुभवी गोलंदाज नसल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबईला हार मानावी लागली. पण, मलिंगा पुढील दोन सामन्यांसाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि श्रीलंका क्रिकेट मंडळ यांच्यात तसा करार झाल्याची माहिती मिळत आहे.