व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...मंगळवारच्या रात्री चेन्नई सुपरकिंग्सला अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर पराभवाचा सामना करावा लागला. आठवड्यात दुसऱ्यांदा कडव्या संघर्षानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ पराभूत झाला. पंजाबकडूनही संघ अशाच झुंजीनंतर पराभूत झाला होता. पराभवाचे मुख्य कारण मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी संघाने केलेली मोठी भागीदारी थोपवू न शकणे हे ठरले आहे. मोहालीत राहुल- मयंक अगरवाल यांच्यात झालेली भागीदारी संघासाठी डोकेदुखी ठरली, तर मंगळवारच्या रात्री वॉटसन- रैना जोडीने त्रस्त करुन सोडले होते.उप्पलवर चेन्नईला नमविल्यानंतर तसेच केकेआरवरही विजय नोंदविल्यामुळे आमचा संघ आत्मविश्वासाने चेन्नईत दाखल झाला होता. वॉटसनने मात्र धडाका करीत आमच्या आशाआकांक्षेवर पाणी फेरले. वॉटसनने मागच्या निर्णायक लढतीच्या आठवणीला उजाळा देत फटकेबाजी केली. त्यावेळी भुवनेश्वरची गोलंदाजी फोडून काढली होती. वॉटसन असा खेळाडू आहे की ज्याला सूर गवसला की थांबविणे कठीण होऊन बसते. डेव्हिड वॉर्नरने शानदार फलंदाजी करीत अर्धशतक ठोकले. त्यानंतर मनीष पांडे याने फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत.विशेषत: केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत मनीषने संघ व्यवस्थापनाचा विश्वास जिंकला. केन आजीच्या निधनामुळे मायदेशी परतला आहे. सामन्यात १७५ ही धावसंख्या खराब नव्हतीच. पण १०-१५ धावा अधिक असत्या, तर बरे वाटले असते. मनीषला मोक्याच्या क्षणी सूर गवसला आहे. ही अशी वेळ आहे की जेव्हा संघातील अनेक विदेशी खेळाडू विश्वचषकासाठी आपापल्या संघात परतणार आहेत. आम्ही लिलावाच्या वेळेपासून योजनाबद्धरीत्या बेंच स्ट्रेंग्थ भक्कम करण्यावर जोर दिला आहे.संघापासून अलिप्त होणारा जॉनी बेयरेस्टॉ हा पहिला विदेशी खेळाडू ठरेल. इंग्लंडचा हा खेळाडू झटपट आमच्या संघाच्या संस्कृतीशी एकरुप झाला. जॉनीसाठी हे सत्र शानदार ठरले. वॉर्नरसोबत त्याने केलेली शतकी भागीदारी विशेष होती. मैदानाबाहेरही त्याचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आहे. खेळाप्रति त्याची समर्पित वृत्ती पाहण्यासारखी आहे. सनरायझर्स कुटुंब त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत असून पुढील सत्रात त्याच्याकडून आणखी योगदानाची अपेक्षा करीत आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2019: जॉनी बेयरेस्टॉचे योगदान अविस्मरणीय- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
IPL 2019: जॉनी बेयरेस्टॉचे योगदान अविस्मरणीय- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
जॉनीसाठी हे सत्र शानदार ठरले. वॉर्नरसोबत त्याने केलेली शतकी भागीदारी विशेष होती.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 3:17 AM