चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला धक्का बसला आहे. हैदराबाद मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सचा सामना करणार आहेत. या लढतीपूर्वी त्यांचा कर्णधार केन विलियम्सनने वैयक्तिक कारणास्तव मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्याला विलियम्सन मुकणार आहे. विशेष म्हणजे आजच्या या सामन्यात महेंद्रसिंग धोनीही खेळण्याची शक्यता कमीच आहे. जर धोनी आज खेळला नाही, तर हा सामना नियमित कर्णधारांशिवाय खेळला जाईल.
आजीचे निधन झाल्यामुळे विलियम्सन मायदेशात परतला आहे आणि तो 27 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात परतण्याची शक्यता आहे. विलियम्सनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार हैदराबाद संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. हैदराबाद सध्या 9 सामन्यांत 5 विजयासह चौथ्या स्थानावर आहे, तर चैन्नई 7 विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. विलियम्सनच्या जागी संघात मोहम्मद नबी किंवा शकीब अल हसनला संधी मिळू शकते. चेपॉकची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत धोनीच्या शानदार खेळीनंतरही एका धावेने पराभव स्वीकारणाऱ्या चेन्नईला हैदराबादविरुद्ध आघाडीच्या फळीकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. चेन्नईची अडचण आघाडीच्या फळीची निराशाजनक कामगिरी आहे, तर सनरायझर्स संघासाठी केवळ सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (५१७) आणि जॉनी बेयरस्टॉ (४४५) रन मशीन बनले आहेत. त्यांची मधली फळी फ्लॉप ठरली आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनीचं खेळणं अनिश्चित आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी त्याला पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून त्याला आज बाकावर बसवले जाऊ शकते. त्याच्या अनुपस्थितीत कर्णधाराची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची उत्सुकता आहे.