कोलकाता, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपला दबदबा कायम राखताना रविवारी कोलकाता नाइट रायडर्सवर 5 विकेट राखून विजय मिळवला. चेन्नईचा हा सातवा विजय असून त्यांनी प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. इडन गार्डनवरील या विजयानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी विजयाच्या आनंदाचा मनमुराद आस्वाद लुटला. याच आनंदाच्या क्षणात केदार जाधवने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चक्क घास भरवला. केदार आणि धोनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
इम्रान ताहीरच्या फिरकी गोलंदाजीनंतर सुरेश रैनाने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने रविवारी इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. कोलकाताचे 162 धावांचे लक्ष्य चेन्नईने 5 विकेट राखून सहज पार केले. ताहीरने 27 धावांत 4 विकेट घेतल्या, तर रैनाने अर्धशतकी खेळी केली. कोलकाताचा हा सलग तिसरा पराभव ठरला. या विजयामुळे चेन्नईचे 14 गुण झाले आहेत.
ख्रिस लीनच्या ( 82) धावांच्या खेळीवर चेन्नईच्या इम्रान ताहीरने पाणी फिरवले. ताहीरने कोलकाताच्या चार प्रमुख खेळाडूंना बाद करत सामन्याचे चित्रच पालटले. त्यामुळे कोलकाताला 20 षटकांत 8 बाद 161 धावा करता आल्या. ताहीरने 4 षटकांत 27 धावा देत 4 विकेट घेतल्या. शार्दूर ठाकूरने दोन विकेट घेतल्या.
पाहा व्हिडीओ...