कोलकाता, आयपीएल : पाठिच्या दुखापतीमुळे केदार जाधव आता चेन्नई सुपर किंग्सकडून यंदाची आयपीएल स्पर्धा खेळू शकणार नाही. पण ही दुखापत गंभीर स्वरुपाची असेल तर विश्वचषकासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते, असे चाहत्यांना वाटत आहे. केदारची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे समजत आहे. त्यामुळे या दुखापतीतून केदार किती दिवसांमध्ये सावरतो, याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असेल.
इंडियन प्रीमिअर लीगच्या क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स संघाने सातत्यपूर्ण खेळ करत क्वालिफायर 1 मध्ये आपले स्थान पक्के केले. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नईला हार मानावी लागली, परंतु त्यांनी 'टॉप टू' मधील आपले स्थान कायम राखले आहे. क्वालिफायर 1 मध्ये चेन्नईला मुंबई इंडियन्स या तगड्या प्रतिस्पर्धीचा सामना करावा लागणार आहे. पण या सामन्यात त्यांना अष्टपैलू खेळाडू केदार जाधवशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात 14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डीप स्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली. निकोलस पूरणने टोलावलेला चेंडू अडवण्यासाठी जाधवने डाइव्ह मारली. जाधवने चेंडू अडवला, परंतु खांदा दुखावल्याने तो मैदानावर तसाच उभा राहिला. त्यानंतर जाधवने मैदान सोडले. संपूर्ण सामन्यात जाधव नंतर क्षेत्ररक्षणाला आलाच नाही. त्याला बदली खेळाडू म्हणून आलेल्या मुरली विजयने पूरणचा सोपा झेल सोडला आणि चेन्नईची सामन्यात पुनरागमन करण्याची संधी हुकली.
मोहाली येथे झालेल्या साखळी गटातील अखेरच्या सामन्यात जाधवच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो उर्वरित आयपीएलमधून माघार घेण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावरजाधवला झालेली दुखापत ही भारतीय संघासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. "केदारच्या खांद्याचा एक्स-रे आज काढण्यात येईल. त्याची दुखापत गंभीर नसावी अशी आशा व्यक्त करतो. उर्वरीत सामन्यात तो खेळेल अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने त्याने लवकरात लवकर बरे व्हावे. प्रार्थना करा की त्याची दुखापत गंभीर नसूदे," असे CSK चे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले.