IPL 2019 : मुंबई इंडियन्स आठ वर्षांनंतर मोहालीत पराभूत, पंजाबचा विजय

IPL 2019 : 2011पासून मुंबई इंडियन्स मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर एकदाही पराभूत झालेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 07:33 PM2019-03-30T19:33:49+5:302019-03-30T19:53:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Kings XI Punjab beat Mumbai Indians by 8 wickets | IPL 2019 : मुंबई इंडियन्स आठ वर्षांनंतर मोहालीत पराभूत, पंजाबचा विजय

IPL 2019 : मुंबई इंडियन्स आठ वर्षांनंतर मोहालीत पराभूत, पंजाबचा विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली, आयपीएल 2019 : ख्रिस गेलने दमदार सुरुवात करून दिल्यानंतर मयांक अग्रवाल व लोकेश राहुल यांनी किंग्स इलेव्हन पंजाबला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवून दिला. 2011पासून मुंबई इंडियन्स मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर एकदाही पराभूत झालेला नाही. त्यांनी येथे खेळलेले चारही सामने जिंकले आहेत. पण, शनिवारी त्यांची ही विजयी मालिका खंडित झाली. आठ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला मोहालीत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने 8 विकेट्स राखून हा सामना जिंकला. 



 

क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना मुंबईला 20 षटकांत 7 बाद 176 धावांपर्यंत मजल मारू दिली. लोकल बॉय युवराज सिंगही फार करिष्मा करू शकला नाही. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले. कृणाल पांड्या व हार्दिक पांड्या यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना मुंबई इंडियन्सला समाधानकारक पल्ला गाठून दिला.  हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत 31 धावा चोपल्या.  रोहितने 19 चेंडूंत 5 चौकारांसह 32 धावा केल्या. डी कॉकने 39 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 60 धावा चोपल्या. 



किंग्ल इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने मॅक्लेघनच्या दुसऱ्या षटकात सलग दोन षटकार खेचून आयपीएलमध्ये 300 षटकारांचा पराक्रम नावावर नोंदवला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये एकाही फलंदाजाला अद्याप 200 षटकारही मारता आलेले नाही. गेलच्या फटकेबाजीनंतरही किंग्स इलेव्हन पंजाबला पॉवर प्लेमध्ये केवळ 38 धावा करता आल्या. 


हार्दिक पांड्याच्या पहिल्याच षटकात पंजाबच्या ख्रिस गेलने दोन खणखणीत षटकार खेचले. त्यामुळे पांड्या किंचितसा दडपणात आलेला पाहायला मिळाला. हार्दिक पांड्याला दोन खणखणीत षटकार खेचणाऱ्या गेलला कृणाल पांड्याने बाद केले. आठव्या षटकात कृणालच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात गेल हार्दिकच्या हाती झेल देऊन बसला... गेलची कॅच पकडताच हार्दिकने मैदानावर डान्स केला. 


कृणाल पांड्यानं पंजाबला आणखी एक हादरा दिला. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल ही सेट जोडी त्यानं फोडली. कृणालने 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मयांकला झेलबाद केले. मयांकने 21 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 43 धावा केल्या. राहुल खिंड लढवत होता. राहुलने 46 चेंडूंत 1 षटकार व 3 चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. राहुलला डेव्हिड मिलरची उत्तम साथ लाभली आणि त्याच्या जोरावर पंजाबने विजय मिळवला. राहुल आणि मिलरने अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी 30 चेंडूंत 50 धाव जोडल्या. पंजाबने 8 विकेट राखून हा सामना जिंकला.

Web Title: IPL 2019: Kings XI Punjab beat Mumbai Indians by 8 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.