मोहाली, आयपीएल 2019 : अटीतटीच्या लढतीत अखेर पंजाबने राजस्थानवर मात केली. पंजाबने राजस्थानपुढे 183 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग राजस्थानला करता आला नाही. या सामन्यात पंजाबने राजस्थानवर 12 धावांनी मात केली आणि या विजयासह पंजाबने चौथे स्थान पटकावले आहे.
पंजाबच्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने चांगली सुरुवात केली. जोस बटलर फटकेबाजी करत असला तरी त्याला 23 धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर राहुल त्रिपाठीने दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. पण अर्धशतकानंतर त्रिपाठीला मोठी खेळी साकारता आली नाही. त्रिपाठीने 45 चेंडूंत 50 धावा केल्या. त्रिपाठी बाद झाल्यावर राजस्थानचे तीन फलंदाज झटपट बाद झाले.
राजस्थानने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सुरुवातीला ख्रिस गेल आणि त्यानंतर मयांक अगरवाल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. गेलने 30 आणि मयांकने 26 धावा केल्या. गेल आणि मयांक हे दोघेही बाद झाल्यावर लोकेश राहुल आणि डेव्हिड मिलर यांनी संघाची धावगती वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. लोकेश राहुल आणि डेव्हिड मिलर यांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबलाराजस्थान रॉयल्सपुढे 183 धावांचे आव्हान ठेवता आले.
राहुलने यावेळी चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलने 45 चेंडूंत अर्धशतकाला गवसणी घातली. पण त्यानंतर राहुलला मोठी खेळी साकारता आली नाही. राहुल 52 धावांवर बाद झाला. या खेळीमध्ये त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. डेव्हिड मिलरने 27 चेंडूंत 40 धावांची खेळई केली.