मोहाली, आयपीएल 2019 : अटीतटीच्या लढतीत अखेर पंजाबने राजस्थानवर मात केली. पंजाबने राजस्थानपुढे 183 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग राजस्थानला करता आला नाही. या सामन्यात पंजाबने राजस्थानवर 12 धावांनी मात केली आणि या विजयासह पंजाबने चौथे स्थान पटकावले आहे. पण, या विजयानंतरही पंजाबच्या गोटात चिंता वाढवणारी बातमी धडकली आहे. मोइजेस हेन्रिक्स आणि मुजीब उर रहमान या पंजाबच्या खेळाडूंना दुखापत झाली आहे. हेन्रिक्सला मंगळवारी पंजाबकडून पदार्पण करायचे होते, परंतु मॅचपूर्वी सराव सत्रातच त्याला दुखापत झाली. तर मुजीबला सामन्यात खांद्याला मार लागला.
पंजाबच्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने चांगली सुरुवात केली. जोस बटलर फटकेबाजी करत असला तरी त्याला 23 धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर राहुल त्रिपाठीने दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. पण अर्धशतकानंतर त्रिपाठीला मोठी खेळी साकारता आली नाही. त्रिपाठीने 45 चेंडूंत 50 धावा केल्या. त्रिपाठी बाद झाल्यावर राजस्थानचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. त्यांना 20 षटकांत 7 बाद 170 धावांपर्यंत मजल मारता आली.
राजस्थानने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सुरुवातीला ख्रिस गेल आणि त्यानंतर मयांक अगरवाल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. गेलने 30 आणि मयांकने 26 धावा केल्या. त्यानंतर लोकेश राहुल आणि डेव्हिड मिलर यांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबलाराजस्थान रॉयल्सपुढे 183 धावांचे आव्हान ठेवता आले. पंजाबचा पुढील सामना 20 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे.
ज्याच्यासाठी मोजले ८.४ कोटी, तो IPLला मुकणार; पंजाबचं 'बॅड लक'पंजाबचा वरूण चक्रवर्तीच्या बोटाला फॅक्चर झाले आहे. स्थानिक सामन्यांमध्ये वरुणने चांगली चमक दाखवली होती. त्यामुळे पंजाबने 8.4 कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले होते. त्यामुळे त्याला जवळपास एक ते दीड महिना खेळता येणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे वरुण यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे.