जयपूर, आयपीएल 2019 : विजयाचा हाता-तोंडाशी आलेला घास राजस्थान रॉयल्सने गमावला. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या 185 धावांचा पाठलाग करताना राजस्थानने चांगली सुरुवात केली होती. राजस्थानने बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शतक पूर्ण केले होते. पण त्यानंतर राजस्थानचा डोलारा कोसळला. मोठे फटके मारण्याच्या नादात राजस्थानच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स पंजाबला आंदण दिल्या आणि 14 धावांनी पराभव ओढवून घेतला.
सलामीवीर ख्रिस गेलच्या भन्नाट खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबला राजस्थानपुढे185 धावांचे आव्हान ठेवता आले. पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी आपला सलामीवीर लोकेश राहुल हा चार धावांवर बाद झाला. पण त्यानंतर गेलची वादळी खेळी पाहायला मिळाली. गेलने 47 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावांची भन्नाट खेळी साकारली.
धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आता विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत येऊन बसला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर असलेल्या गेलने आयपीएलमधल्या चार हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा रैना आघाडीवर आहे. रैनाने 177 सामन्यांत 5004 धावा केल्या आहेत आणि आयपीएलमध्ये 5000 धावा प्रथम करण्याचा मानही रैनाने पटकावला आहे. या क्रमवारीत रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा कोहली (4954), मुंबई इंडियन्सचा शर्मा ( 4507), दिल्ली कॅपिटल्सचा गंभीर ( 4217), कोलकाता नाइट रायडर्सचा उथप्पा ( 4121), दिल्ली कॅपिटल्सचा धवन ( 4101), सनरायझर्स हैदराबादचा वॉर्नर ( 4099) आणि चेन्नई सुपर किंग्सचा धोनी ( 4016) यांचा क्रमांक येतो.
या सामन्यापूर्वी गेलच्या नावावर 112 सामन्यांत 3994 धावा होत्या. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत गेलने 4 सामन्यांत 106 च्या सरासरीने 424 धावा कुटल्या होत्या. या मालिकेत त्याने 20 चौकार व 39 षटकार खेचले होते. त्याचा हाच फॉर्म आयपीएलमध्येही पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आयपीएलमध्ये गेलच्या नावावर सहा शतकं आणि 24 अर्धशतकं आहेत.