कोलकाता, आयपीएल 2019 : इम्रान ताहीरच्या फिरकी गोलंदाजीनंतर सुरेश रैनाने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने रविवारी इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. कोलकाताचे 162 धावांचे लक्ष्य चेन्नईने 5 विकेट राखून सहज पार केले. ताहीरने 27 धावांत 4 विकेट घेतल्या, तर रैनाने अर्धशतकी खेळी केली. कोलकाताचा हा सलग तिसरा पराभव ठरला. या विजयामुळे चेन्नईचे 14 गुण झाले असून ते प्ले ऑफच्या उंबरठ्यावर आले आहेत.
ख्रिस लीनच्या ( 82) धावांच्या खेळीवर चेन्नईच्या इम्रान ताहीरने पाणी फिरवले. ताहीरने कोलकाताच्या चार प्रमुख खेळाडूंना बाद करत सामन्याचे चित्रच पालटले. त्यामुळे कोलकाताला 20 षटकांत 8 बाद 161 धावा करता आल्या. ताहीरने 4 षटकांत 27 धावा देत 4 विकेट घेतल्या. शार्दूर ठाकूरने दोन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना आंद्रे रसेलने टाकलेल्या तिसऱ्या षटकात फॅफ ड्यू प्लेसिसने सलग चार चौकार. चेन्नईने 3 षटकांत 29 धावा केल्या. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हॅरी गर्नेयने चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसनला ( 6) बाद केले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाने सहावी धाव घेताच विक्रमाची नोंद केली. कोलकाता विरुद्ध सर्वाधिक 765 धावा करण्याचा विक्रम त्याने केला. रैनाने सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरचा 762 धावांचा विक्रम मोडला. या क्रमवारीत मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा ( 757) धावांवर आहे.
कोलकाताविरुद्धसुरेशरैनाचाविक्रम, वॉर्नरलाटाकलेमागेhttps://t.co/z2jL9ek1na@KKRiders@ChennaiIPL#KKRvCSKpic.twitter.com/ZILBhk25d7
— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) April 14, 2019
सहाव्या षटकात चेन्नईचा सेट फलंदाज ड्यू प्लेसिस बाद झाला. सुनील नरीनने त्याला 24 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर रैना व अंबाती रायुडू यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु पियूष चावलाने ही जोडी फोडली. चावलाने रायुडूला ( 5) बाद केले. चावलाने पुढच्याच षटकात चेन्नईच्या केदार जाधवला ( 20) पायचीत केले. चेन्नईने 14 षटकांत 4 बाद 109 धावा केल्या. सुनील नरीनने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पायचीत केले. धोनीने 16 धावा केल्या. रैनाने 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे 36वे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह रैनाने विराट कोहली व गौतम गंभीर यांच्याशी बरोबरी केली. या दोघांच्या नावावर 36 अर्धशतकं आहेत. डेव्हिड वॉर्नर 39 अर्धशतकांसह आघाडीवर आहे. 19व्या षटकात रवींद्र जडेजाने सलग तीन चौकार मारून चेन्नईला विजयासमीप आणले.
Web Title: IPL 2019 KKR vs CSK: Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 5 wicket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.