कोलकाता, आयपीएल 2019 : आयपीएलच्या 12व्या हंगामात आव्हान टिकवण्यासाठी अखेरची संधी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे एबी डिव्हिलियर्सला KKRविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय कर्णधार विराट कोहलीने घेतला आहे. डिव्हिलियर्सच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करायचा नसल्याचे कोहलीने सांगितले. कोलकाताने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.
गत आठवड्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरूला पराभूत केले होते. मुंबईने 172 धावांचे आव्हान 5 विकेट ऱाखून सहज पार केले. हार्दिक पंड्याने 16 चेंडूंत नाबाद 37 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या 172 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सलामी दिली. पहिल्या सहा षटकांमध्ये मुंबई दहाच्या सरासरीने धावा केल्या. पण त्यानंतर मात्र मुंबईला रोहित शर्मा आणि क्विंटन डी'कॉकच्या रुपात दोन धक्के बसले. रोहितने 28 तर डी'कॉकने 40 धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने 9 चेंडूंत 21 धावांची खेळी साकारली. त्यानंतर कृणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव संघाचा डाव सावरला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार 29 धावांवर बाद झाला.
मुंबईने नाणेफेक जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पण बंगळुरुला पहिलाच धक्का कर्णधार विराटकोहलीच्या रुपात बसला. कोहलीला आठ धावा करता आल्या. त्यानंतर पार्थिव पटेलही फटकेबाजी करत होता, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पार्थिवने 20 चेंडूंत 28 धावा केल्या. पार्थिव पटेल बाद झाल्यावर वानखेडेवर आले ते डिव्हिलियर्सचे वादळ. डी'व्हिलियर्सला यावेळी मोईन अलीने चांगली साथ दिली. या दोघांनी बंगळुरूची धावांची गती वाढवली. अलीने 32 चेंडूंत 50 धावा केल्या. डिव्हिलियर्सने 51 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 75 धावा केल्या.
याच सामन्यात जसप्रीत बुमराहने टाकलेला एक चेंडू डिव्हिलियर्सच्या मानेवर आदळला होता.
पाहा व्हिडीओ...