चेन्नई, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्सच्या भेदक गोलंदाजीपुढे कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना लोटांगण घालावे लागले. यामध्ये अपवाद ठरला तो आंद्रे रसेल. कारण सरेलने ४४ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ५० धावांची खेळी साकारल्यामुळेच कोलकात्याला प्रथम फलंदाजी करताना 108 धावा करता आल्या. दीपक चहारने भेदक मारा करत तीन बळी मिळवले, तर इम्रान ताहिर आणि हरभजन सिंग यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.
चेन्नईने नाणेफेक जिंकून कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सुनील नरिनच्या रुपात कोलकात्याला मोठा धक्का बसला. नरिनला यावेळी सहा धावा करता आल्या. त्यानंतर नितीश राणा शून्यावर बाद झाला. त्यानंतर ठराविक फरकाने कोलकात्याचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा अर्धा संघ ४४ धावांवर माघारी परतला.