मुंबई, आयपीएल २०१९ : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी केली. मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाला केकेआरच्या फलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले. रसेलच्या ४० चेंडूंत नाबाद ८० धावांच्या जोरावर कोलकाताला मुंबईपुढे २३३ धावांचे आव्हान ठेवता आले. रसेलने आपल्या खेळीत सहा चौकार आणि आठ षटकार लगावले.
मुंबईने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या गोष्टीचा चांगलाच फायदा केकेआरने उचलला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी मुंबईच्या गोलंदाजीवर हल्ला करायला सुरुवात केली. ख्रिस लिन आणि शुभमन गिल या दोघांनीही अर्धशतके लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. लिन आणि गिल या दोघांनी संघासाठी ९६ धावांची सलामी दिली. लिनने २९ चेंडूंत ५४ धावांची खेळी साकारली. लिन बाद झाल्यावर गिलने गोलंदाजांचा समाचार घेणे सुरुच ठेवले. गिलने ४५ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७६ धावा काढल्या. त्यानंतर आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांनीही मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.