मोहाली, आयपीएल 2019 : लोकेश राहुल ( 71) आणि ख्रिस गेल (28) यांच्या 108 धावांच्या सलामीनेच किंग्स इलेव्हन पंजाबचा विजय पक्का केला होता. मात्र, हरभजन सिंगने पंजाबला लागोपाठ तीन धक्के देत सामन्यात चुरस निर्माण केली. निकोलस पुरणचा झेल सोडणे चेन्नई सुपर किंग्सला महागात पडले आणि पंजाबने विजयासह आयपीएलचा निरोप घेतला. चेन्नईचे 171 धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले. पुरणने 21 चेंडूंत 36 धावा केल्या. या पराभवामुळे चेन्नईला अव्वल स्थानावर कायम राहण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. पण, त्यांनी क्वालिफायर 1 मधील स्थान पक्के केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सने फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांच्या दमदार खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 171 धावांचे लक्ष्य ठेवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विक्रमाला गवसणी घातली. त्यांना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला. ड्यू प्लेसिसचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. सॅम कुरनच्या अप्रतिम यॉर्करने ड्यू प्लेसिसचा त्रिफळा उडवला. ड्यू प्लेसिसने 55 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांसह 96 धावा केल्या. रैना 38 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या. पंजाबच्या कुरनने तीन, तर मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या.लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी पंजाबला धडाकेबाज सुरुवात करून दिली. पण, चौकार षटकारांच्या आतषबाजीत गेलपेक्षा राहुल अधिक आक्रमक खेळ केला. लोकेशने 19 चेंडूंत अर्धशतक केले. आयपीएलमधील हे तिसरे जलद अर्धशतक ठरले. गेल आणि राहुल यांनी 12च्या सरासरीनं चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांची 108 धावांची भागीदारी हरभजन सिंगने संपुष्टात आणली. भज्जीनं 11व्या षटकात राहुल व गेल यांना लागोपाठ माघारी पाठवले. भज्जीची हॅटट्रिक मात्र हुकली. राहुल 36 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकार खेचून 71 धावा करत माघारी परतला. गेलने 28 चेंडूंत 28 धावा केल्या. भज्जीनं पुढच्याच षटकात पंजाबला आणखी एक धक्का देत मयांक अग्रवालला माघारी पाठवले. ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर मुरली विजयने निकोलस पुरणचा सोपा झेल सोडला. त्याच पुरणने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली.