मोहाली, आयपीएल 2019 : घरच्या मैदानावर खेळताना शुबमन गिलने यजमान किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. ख्रिस लीन आणि गिल यांनी कोलकाता नाईट रायडर्सला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या साथीनं गिलने कोलकाताला विजयाच्या समीप आणले. लीन आणि गिलने पहिल्या विकेटसाठी 62 धावा केल्या, तर गिल व रसेल यांनी 50 धावांची भागीदारी केली. या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर कोलकाताने शुक्रवारी 7 विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. शुबमनने 49 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारासह नाबाद 65 धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिकने 9 चेंडूंत नाबाद 21 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या सामन्यात ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांना अपयश आल्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाब अडचणीत सापडला होता. मात्र, निकोलस पूरण आणि मयांक अग्रवाल यांनी संघाला सुस्थितीत आणले. त्यांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 184 धावांचे आव्हान ठेवले. सॅम कुरन आणि मनदीप सिंग यांनी अखेरच्या षटकात चांगलीच फटकेबाजी केली. कुरनने 23 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने 24 चेंडूंत नाबाद 55 धावा केल्या. पूरण आणि अग्रवाल या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांची 69 धावांची भागीदारी नितीश राणाने तोडली. 27 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 48 धावा करणाऱ्या पूरणला त्याने बाद केले. त्यानंतर अग्रवालकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु नरीनने त्याला धावबाद केले. अग्रवाल 26 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 36 धावा करून माघारी परतला. अखेरच्या षटकात कुरनने चांगलीच फटकेबाजी केली.