मोहाली, आयपीएल 2019 : क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना मुंबईला 20 षटकांत 176 धावांपर्यंत मजल मारून दिली. लोकल बॉय युवराज सिंगही फार करिष्मा करू शकला नाही. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले. कृणाल पांड्या व हार्दिक पांड्या यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना मुंबई इंडियन्सला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत 31 धावा चोपल्या.
रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईने 5 षटकातं 50 धावा केल्या. त्यात रोहितच्या 32, तर डी कॉकच्या 18 धावांचा समावेश आहे. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्डस विलजोनने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माला पायचीत केले. रोहितने 19 चेंडूंत 5 चौकारांसह 32 धावा केल्या. पहिल्या पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने 1 बाद 62 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मुरुगन अश्विनने त्याच्या पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला धक्का दिला. त्याने सूर्यकुमार यादवला पायचीत करताना किंग्स इलेव्हन पंजाबला दुसरे यश मिळवून दिले.