मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला धक्का बसला होता. प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगाला राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशी परतावे लागले होते आणि त्यामुळे मलिंगाला आयपीएलमधील सहा सामन्यांना मुकावे लागणार होते. मलिंगा नसल्याचा फटका पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला बसला. संघात अनुभवी गोलंदाज नसल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबईला हार मानावी लागली. त्यात भर म्हणून आणखी एक प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाली, परंतु मुंबई इंडियन्सला आनंद देणारी बातमी मंगळवारी धडकली आहे. मलिंगा पुढील दोन सामन्यांसाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि श्रीलंका क्रिकेट मंडळ यांच्यात तसा करार झाल्याची माहिती मिळत आहे.
आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवताना श्रीलंकेच्या निवड समितीनं मलिंगाला स्थानिक वन डे स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे. गतवर्षी मलिंगा मुंबई इंडियन्सच्या साहाय्यक खेळाडूंच्या चमूत होता, परंतु लिलावात मुंबईने त्याला स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून 2 कोटी रुपयांत संघात दाखल करून घेतले. स्थानिक वन डे स्पर्धेत तो गॅल संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. ही स्पर्धा 4 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यामुळे मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांना मुकावे लागणार होते. मात्र, बीसीसीआयच्या मध्यस्थीनंतर मलिंगाला दोन सामने खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू ( 28 मार्च ) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( 30 मार्च) यांच्याविरुद्धच्या सामन्यासाठी मलिंगा उपलब्ध असणार आहे.
बीसीसीआयनं मलिंगाबाबतचा निर्णय घेण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाला तीन दिवसांची मुदत दिली आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाला बीसीसीआयकडून बरीच आर्थिक मदत मिळते. शिवाय गतवर्षी लंकन प्रीमिअर लीगसाठीही बीसीसीआयनं त्यांना मदत केली होती.
मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून 37 धावांनी हार मानावी लागली होती. दिल्लीच्या 213 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी चांगली फटकेबाजी केली. पण त्यांना मोठ्या खेळी साकारता आल्या नाहीत. मुंबईच्या संघात आलेल्या युवराज सिंगने मात्र दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत मुंबईचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण युवराजची ही झुंज अपयशीच ठरली आणि मुंबईला दिल्लीकडून 37 धावांनी पराभव पत्करावा लागला. युवराजने 35 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 53 धावांची खेळी साकारली.
Web Title: IPL 2019: Lasith Malinga likely to play Mumbai Indian's next two games
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.