कोलकाता, आयपीएल 2019 : आंद्रे रसेल आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफान आतषबाजीनं कोलकातातील इडन गार्डन दणाणून सोडलं. कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून झुंज पाहायला मिळाली. मुंबईने लक्ष्याचा पाठलाग करताना 7 बाद 198 धावा केल्या. रसेलच्या 40 चेंडूंत नाबाद 80 धावांच्या खेळीला हार्दिकने 34 चेंडूंत 91 धावांचे तोडीसतोड प्रत्युत्तर मिळाले. हा सामना मुंबई इंडियन्सने गमावला असला तरी हार्दिकच्या खेळीनं सर्वांची मन जिंकली. पण, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं एक कृती करून क्रिकेट चाहत्यांचा रोष ओढावून घेतला आहे. रोहितच्या या अखिलाडूवृत्तीवर नेटिझन्सही सडकून टीका करत आहेत. रोहितनं असं वागायला नको होतं, असं मत अनेकांनी व्यक्त केलं.
सलामीला बढती मिळालेल्या शुबमन गिलनं ख्रिस लीनच्या सोबतीनं कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. लीनने 29 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांसह 54 धावा चोपल्या. त्यानंतर रसेल नावाचे वादळ घोंगावलं. रसेल आणि गिल जोडीनं अर्धशतकी भागीदारी केली. गिल 45 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकार खेचून 76 धावांत माघारी परतला. उर्वरित षटकांत रसेरची षटकार-चौकारांच्या आतषबाजीनं इडन गार्डन दणाणून सोडलं. रसेलने 40 चेंडूंत नाबाद 80 धावा कुटल्या आणि त्यात 6 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. या त्रिकुटाच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने 2 बाद 232 धावांचा डोंगर उभा केला. यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात साजेशी झाली नाही. क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा हे दोन्ही सलामीवीर अवघ्या 21 धावांवर माघारी परतले. सुनील नरीनच्या सामन्याच्या दुसऱ्याच षटकात डी कॉकला झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात हॅरी गर्नीने हिटमॅन रोहितला पायचीत केले. या निर्णयाविरोधात रोहितनं DRS घेतला आणि त्यातही त्याला बाद केले. त्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेनं जात असताना रोहितनं पंचांच्या जवळ पोहोचताच बॅट मुद्दाम स्टम्प्सना लावली आणि राग व्यक्त केला. रोहितच्या या कृतीवर टीका होत आहे.
पाहा व्हिडीओ...
रोहितला सामन्यानंतर दंड भरावा लागला. आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहितला सामन्यातील मानधनातील 15 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.