मोहाली, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर 12 लाखांचा दंड भरावा लागला. शनिवारी मोहालीत झालेल्या या सामन्यात यजमान पंजाबने 8 विकेट राखून विजय मिळवला. त्यामुळे मोहालीतील 8 वर्षांची मुंबई इंडियन्सची विजयी मालिकाही खंडीत झाली. यात भर म्हणून रोहितवर दंडात्मक कारवाई झाली. या सामन्यात षटकांचा वेग न ( स्लो ओव्हर रेट) राखल्यानं रोहितला हा दंड भरावा लागला.
ख्रिस गेलने दमदार सुरुवात करून दिल्यानंतर मयांक अग्रवाल व लोकेश राहुल यांनी किंग्स इलेव्हन पंजाबला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवून दिला. 2011पासून मुंबई इंडियन्स मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर एकदाही पराभूत झालेला नाही. त्यांनी येथे खेळलेले चारही सामने जिंकले आहेत. पण, शनिवारी त्यांची ही विजयी मालिका खंडित झाली. आठ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला मोहालीत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने 8 विकेट्स राखून हा सामना जिंकला.
क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना मुंबईला 20 षटकांत 7 बाद 176 धावांपर्यंत मजल मारू दिली. लोकल बॉय युवराज सिंगही फार करिष्मा करू शकला नाही. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले. कृणाल पांड्या व हार्दिक पांड्या यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना मुंबई इंडियन्सला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत 31 धावा चोपल्या. रोहितने 19 चेंडूंत 5 चौकारांसह 32 धावा केल्या. डी कॉकने 39 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 60 धावा चोपल्या.
त्याला प्रत्युत्तर म्हणून गेलने 24 चेंडूंत 40 धावा चोपल्या. त्यात 4 षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसह आयपीएलमध्ये 300 षटक मारणारा तो पहिला खेळाडू ठरला. लोकेश राहुलने अखेरपर्यंत खिंड लढवताना 57 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 70 धावा केल्या. त्याला मयांक अग्रवालने 21 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 43 धावा करत चांगली साथ दिली.