Join us  

IPL 2019: धोनीला 'मांकड' करायला गेला, पण कृणालचाच 'पोपट' झाला; पाहा Video

बहुधा कृणालची रणनीती धोनीनं आधीच ओळखली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 2:35 PM

Open in App
ठळक मुद्देक्रिकेटचं शास्त्र कोळून प्यायलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीपुढे 'मांकडिंग' हे शस्त्र निष्प्रभ ठरल्याचोरट्या धावा घेण्यात जाधव आणि धोनी माहीर आहेत.कृणालला हात हलवत पुन्हा बॉलिंग टाकायला जावं लागलं.

मुंबई, आयपीएल २०१९ : किंग्स इलेव्हनचा कर्णधार रविचंद्रन अश्विननं जोस बटलरला 'मांकडिंग' नियमानुसार बाद केल्यानंतर क्रिकेटवर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसा हा नियम नवा नाही. त्यावरून याआधीही चर्चा झडल्यात. पण, अश्विन-बटलर प्रकरणामुळे आयपीएलमध्ये फलंदाजांना घाबरवण्यासाठी गोलंदाजांना एक नवं शस्त्र मिळालं आहे. परंतु, क्रिकेटचं शास्त्र कोळून प्यायलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीपुढे हे शस्त्र निष्प्रभ ठरल्याचं बुधवारच्या मुंबई-चेन्नई सामन्यात पाहायला मिळालं. धोनीला 'मांकड' करायला गेलेल्या कृणाल पांड्याचा 'पोपट' झाला आणि चेन्नईच्या चाहत्यांनी एकच कल्ला केला. मुंबईच्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी यांनी चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. १४व्या ओव्हरमध्ये केदार स्ट्राईकवर होता, तेव्हा कृणाल आपली दुसरी ओव्हर टाकायला आला. चोरट्या धावा घेण्यात जाधव आणि धोनी माहीर आहेत. अशा धावा घेताना, गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटायच्या आतच नॉन-स्टाईकर क्रीझ सोडतो. हेच गणित बांधून कृणाल पांड्या बॉल टाकता-टाकता थांबला. पंजाबविरुद्धच्या सामन्यात मयांक अग्रवाल नॉन-स्ट्राईकला असताना त्यानं अशीच खेळी केली होती. त्यावेळी मयांक क्रीझच्या बाहेर होता. त्याला पंचांनी समज दिली होती. तसाच कृणालचा 'प्लॅन' होता. पण तो धोनीनं 'फ्लॉप' ठरवला. बहुधा कृणालची रणनीती धोनीनं आधीच ओळखली होती. त्यामुळे त्यानं क्रीझ सोडलंच नाही आणि कृणालला हात हलवत पुन्हा बॉलिंग टाकायला जावं लागलं. त्यावेळी मुंबईचा विकेट-कीपर क्विंटन डी-कॉकच्या चेहऱ्यावरचं हसू खूप बोलकं होतं. 

मुंबई-चेन्नई सामन्यात लक्षवेधी ठरला, तो पोलार्डने घेतलेला सुरेश रैनाचा भन्नाट झेल. हवेतून सीमेपार जात असलेला चेंडू पोर्लाडनं उंच उडी मारत एका हातात टिपला. तो पाहून रैनाचा चेहराच पडला, तर मुंबईने जल्लोष केला. त्याआधी शेन वॉटसनचा झेलही उंच-धिप्पाड पोलार्डनं जबरदस्त घेतला होता. मुंबईला १७० धावांपर्यंत पोहोचवण्यातही त्याच्या फटकेबाजीचा मोलाचा वाटा होता. 

मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग चेन्नईला करता आला नाही. धोनीसेनेला २० ओव्हरमध्ये १३३ धावाच करता आल्या आणि मुंबईनं ३७ धावांनी हा सामना जिंकला. यंदाच्या आयपीएलमधील मुंबईचा हा दुसरा विजय ठरला, तर चेन्नईचा पहिला पराभव. आयपीएल स्पर्धेत १०० विजय साकारणारा मुंबई हा पहिलाच संघ ठरला आहे.  

टॅग्स :आयपीएल 2019महेंद्रसिंग धोनीमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स