मुंबई, आयपीएल 2019 : क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी उभारलेल्या मजबूत पायावर मुंबई इंडियन्सला मोठी अपेक्षित धावसंख्या करता आली नाही. कर्णधार रोहित बाद झाल्यानंतर मुंबईच्या धावांचा ओघ आटला. किरॉन पोलार्डही स्वस्तात बाद झाला. डी कॉक व हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली, परंतु त्यांना राजस्थान रॉयल्सविरुद्ध 5 बाद 187 धावा करता आल्या. डी कॉकने 52 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह 81, तर रोहितने 32 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 47 धावा केल्या. पांड्याने 11 चेंडूंत 28 धावा केल्या.
कृष्णप्पा गौथमच्या तिसऱ्या षटकात मुंबई इंडियन्सने 18 धावा चोपल्या. क्विंटन डी कॉकने 13 धावा काढल्या, तर रोहितने 5 धावांची भर घातली. त्यानंतर धवल कुलकर्णीने टाकलेल्या चौथ्या षटकार रोहित-डी कॉक जोडीने 14 धावा जोडल्या. मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता जवळपास दहाच्या सरासरीने 57 धावा केल्या. पॉवर प्लेमधील मुंबई इंडियन्सची ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 1 बाद 62 धावा केल्या होत्या. दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट गमावलेली नाही. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी करताच आणखी एक विक्रमाची नोंद केली. यंदाच्या आयपीएलमधली मुंबई इंडियन्सकडून झालेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.