मुंबई, आयपीएल 2019 : क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माच्या फटकेबाजीला जोस बटलर आणि अजिंक्य रहाणेकडून सडेतोड उत्तर मिळाले. राजस्थान रॉयल्सने शनिवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा विजयरथ रोखला. राजस्थानने 4 विकेट राखून मुंबईला नमवले आणि यंदाच्या आयपीएलमधील दुसऱ्या विजयाची नोंद केली. पण, राजस्थानला हा विजय मिळवण्यासाठी मुंबईने चांगलेच झुंजवले. कृणाल पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी अखेरच्या षटकांत राजस्थानला धक्के देत सामन्यात चुरस निर्माण केली होती. पण, राजस्थानने अखेरच्या षटकात विजय मिळवला.
क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी उभारलेल्या मजबूत पायावर मुंबई इंडियन्सला मोठी अपेक्षित धावसंख्या करता आली नाही. कर्णधार रोहित बाद झाल्यानंतर मुंबईच्या धावांचा ओघ आटला. किरॉन पोलार्डही स्वस्तात बाद झाला. डी कॉक व हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली, परंतु त्यांना राजस्थान रॉयल्सविरुद्ध 5 बाद 187 धावा करता आल्या. डी कॉकने 52 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह 81, तर रोहितने 32 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 47 धावा केल्या. पांड्याने 11 षटकांत 28 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी राजस्थानला दमदार सुरुवात करून दिली. घरच्या मैदानावर खेळणारा अजिंक्य चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने जोसेफ अल्झारीच्या एका षटकात 17 धावा चोपून काढल्या. पॉवर प्लेमध्ये राजस्थानने एकही विकेट न गमावता 59 धावा केल्या. मात्र, टाईम आऊटनंतरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अजिंक्य बाद झाला. कृणाल पांड्याने डीप मिडविकेटला सूर्यकुमार यादव करवी त्याला झेलबाद केले. अजिंक्यने 21 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 37 धावा केल्या. बटलरने कृणालच्या पुढच्याच षटकात 16 धावा चोपून काढल्या. त्यात दोन खणखणीत षटकारांचा समावेश होता. बटलरने 10व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत संघाचे शतक आणि वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. बटरलने 50 धावांसाठी 29 चेंडूंचा सामना केला आणि त्यात 4 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता.