हैदराबाद, आयपीएल 2019 : अल्झारी जोसेफच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 136 धावा केल्या होत्या. हैदराबादला या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला नाही आणि मुंबईने 40 धावांनी विजय मिळवला. अल्झारीने भेदक मारा करत फक्त 12 धावांमध्ये सहा विकेट घेतल्या. आयपीएलमधली ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. हैदराबादचा संघ यावेळी 96 धावांवर तंबूत परतला. अल्झारीच्या या विक्रमी कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सचा सल्लागार सचिन तेंडुलकरने एक खंत व्यक्त केली.
अल्झारीने सोहेल तन्वीरच्या नावावर असलेला विक्रम मोडला. तन्वीरने 2008मध्ये 14 धावांत 6 बळी घेतले होते. त्याचा विक्रम 12 वर्षांनी अल्झारीने मोडला. तन्वीरने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध हा विक्रम केला होता. अल्झारी म्हणाला,''अविश्वसनीय. आयपीएलमध्ये यापेक्षा चांगली सुरुवात होऊच शकत नाही. त्यामुळे या क्षणाचा मला मनमुराद आनंद लुटायचा आहे. मैदानावर उतरून संघासाठी 100 टक्के योगदान देण्याचा निर्धार मी केला होता. त्यात मला यश आले, याचा आनंद आहे.''
अँटिग्वाच्या या खेळाडूने घेतलेल्या सहा विकेट्समध्ये डेव्हिड वॉर्नर या दिग्गजाचाही समावेश आहे. पण, वॉर्नरची विकेट ही जोसेफला समाधान देणारी नव्हती. तो म्हणाला,''अखेरच्या विकेटने ( सिद्धार्थ कौल) मला सर्वात जास्त समाधान दिले, कारण त्यानंतर मुंबई इंडियन्सने सामना जिंकला होता. संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय होते. त्यामुळे वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा आहे.''
मुंबई इंडियन्सने या विजयासह सहा गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. हैदराबाद येथे झालेल्या या सामन्यासाठी संघाचा सल्लागार सचिन तेंडुलकर अनुपस्थित होता. त्यामुळे त्याला जोसेफचा विक्रम प्रत्यक्ष पाहता आला नाही. पण, त्याने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला,'' मुंबई इंडियन्सचा नवीन सहकारी अल्झारी जोसेफची विक्रमी कामगिरी प्रत्यक्ष पाहता न आल्याची खंत वाटते. मी तिथे असायला हवा होतो. मुंबई इंडियन्सच्या लढावू वृत्तीचे कौतुक.
Web Title: IPL 2019 MIvsSRH : I wish I could’ve been there to witness a brilliant spell of Alzarri Joseph, Sachin Tendulkar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.