हैदराबाद, आयपीएल 2019 : बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना झाला. हा सामना हैदराबादने सहजपणे जिंकला. महेंद्रसिंग धोनी चेन्नईच्या संघात नसल्याने हैदराबादला विजय मिळवता आला, असे काही जण म्हणत आहेत. पण धोनी या सामन्यात का खेळला नाही, हे तुम्हाला माहिती आहे का...
हैदराबादपूर्वी चेन्नईचा संघ कोलकाता नाइट रायडर्स संघाशी भिडला होता. या सामन्यात कोलकातावर चेन्नईने पाच विकेट्स राखून विजय मिळवला होता. चेन्नईला हा सामना जिंकल्यावर ते हैदराबादला पराभूत करतील, असे भाकित काही जणांन वर्तवले होते. धोनी हैदराबादविरुद्ध खेळणार, हे गृहीत धरून काही जणांनी हे मत व्यक्त केले होते. पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सुरेश रैना नाणेफेकीसाठी चेन्नईकडून आला आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनीने विश्रांती घेणे पसंत केले. सामन्यापूर्वी तो मैदानात आला होता खरा, पण तो हा सामना खेळला नाही. कारण यापूर्वी झालेल्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या पाठिला दुखापत झाली होती. ही दुखापत थोडी गंभीर असल्यामुळे त्याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळणे टाळले आणि विश्रांती घेतली.
चेन्नई एक्सप्रेस हैदराबादने रोखलीचेन्नईची विजयी एक्सप्रेस अखेर हैदराबादने आजच्या सामन्यात रोखली. सलामीवीर जॉनी बेअरस्टोव आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनीही अर्धशतके झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चेन्नईने हैदराबादपुढे 133 धावांचे आव्हान ठेवले होते. हैदराबादच्या संघाने हे आव्हान यशस्वीरीत्या पेलत विजय साकारला.
बेअरस्टोव आणि वॉर्नर या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच सामाचार घेतला. अर्धशतक पूर्ण केल्यावर दुसऱ्याच षटकात अर्धशतकवीर डेव्हिड वॉर्नर आऊट झाला. वॉर्नरला दीपक चहारने ५० धावांवर असताना आऊट केले. पण त्यानंतरही बेअरस्टोवने दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दमदार सलामी मिळाल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्सला फक्त 132 धावांवरच समाधान मानावे लागले. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी चेन्नईच्या शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ७९ धावांची सलामी दिली. वॉटसनने यावेळी २९ चेंडूंत ३१ धावा केल्या. शेनपेक्षा फॅफ चांगल्या फॉर्मात होता. फॅफने ३१ चेंडूंत ४५ धावांची खेळी साकारली. या ४५ धावांच्या खेळीत फॅफने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले.