बंगळुरू, आयपीएल 2019 : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं आपला अनुभव पणाला लावताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना जवळपास खिशात घातलाच होता. मात्र, अखेरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला दोन धावांचा फटका मारता आला नाही आणि पार्थिव पटेलने यष्टिमागून अचूक निशाणा साधत शार्दूल ठाकूरला धावबाद केले. पटेलच्या या थ्रोने चेन्नई सुपर किंग्सला एका धावेने हार मानण्यास भाग पाडले. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील या थरारनाट्याची दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ( आयसीसी) घेतली. त्यांनी एका विजयी थ्रोची आठवण करून देताना धोनीची फिरकी घेतली.
23 मार्च 2016च्या आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील तो सामना होता. भारत आणि बांगलादेश यांच्यातील ती लढत बंगळुरू येथे खेळवण्यात आली होती. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात बांगलादेशचे 8 फलंदाज 147 धावांवर माघारी परतले होते. तीन चेंडूंत दोन धावांची गरज असताना त्यांचे दोन फलंदाज लागोपाठ माघारी परतले. त्यामुळे सामना 1 चेंडूत दोन धावा असा अटीतटीचा झाला. हार्दिक पांड्याने शेवटचा चेंडू टाकला आणि त्यावर बांगलादेशच्या खेळाडूला फटका मारता आला नाही. चेंडू यष्टिरक्षक धोनीच्या हातात गेला, परंतु नॉन स्ट्रायकरवरील फलंदाज धाव घेण्यासाठी पळाला. धोनीनं यष्टिंच्या दिशेने धाव घेताना बांगलादेशच्या फलंदाजाला धावबाद केले. भारताने एका धावेने हा सामना जिंकला.
पाहा व्हिडिओ..