चेन्नई, आयपीएल 2019 : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या सलामीच्या सामन्यात रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूवर सात विकेट राखून सहज विजय मिळवला. या विजयानंतर चेन्नईचा संघ दिल्ली कॅपिटल्सचा सामना करण्यासाठी फिरोज शाह कोटला स्टेडियमच्या दिशेनं रवाना झाला. चेन्नईहून नवी दिल्लीकडे येताना संघातील खेळाडूंनी चेन्नईच्या विमानतळावर मस्ती केली. खेळाडूंनी विमानतळाला सेल्फी पॉईंट बनवले होते. फावल्या वेळेत गोलंदाज मोहित शर्मानं चेन्नईच्या खेळाडूंची मुलाखत घेतली आणि त्यात त्याने पहिल्या विजयाबद्दल विचारणा केली.
मोहित आणि केदार जाधव यांच्यातील संभाषणात कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं उडी घेतली आणि जाधवची फिरकी घेतली. जाधवने बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात नाबाद 13 धावा केल्या. जाधवने यावेळी 2018च्या आयपीएल हंगामातील पहिल्या सामन्याच्या आठवणीला उजाळा दिला. त्याही हंगामातील पहिल्या सामन्याच्या विजयी क्षणाच्यावेळी जाधव खेळपट्टीवर होता आणि यंदाच्या पहिल्या विजयातही तो खेळपट्टीवर होता.
जाधव म्हणाला,''मागील हंगाम आणि आताच्या हंगामातील पहिल्या सामन्यात बरेच साम्य आहे. आम्ही गतवर्षी पहिला सामना जिंकलो होतो आणि त्यावेळी मी खेळपट्टीवर उपस्थित होतो आणि यंदाही तसेच घडले.'' या वक्तव्यावर धोनीनं त्याची चांगलीच फिरकी घेतली. 2018च्या पहिल्या सामन्यात जाधवला दुखापत झाली होती आणि त्याला संपूर्ण सत्र मुकावे लागले होते. त्यावरून धोनी त्याला म्हणाला,'' परत घरी जायचा प्लॅन करत आहेस का?''
धोनीच्या या वाक्यावर जाधवनेही तोडीसतोड उत्तर दिले. पाहा व्हिडीओ...
सलामीच्या सामन्यात हरभजन सिंग, इम्रान ताहीर आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीनं बंगळुरूचा डाव 70 धावांत गुंडाळला आणि चेन्नईने हे माफक लक्ष्य सहज पार केले. नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं संथ खेळपट्टी पाहून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भज्जी, ताहीर आणि जडेजाने योग्य ठरवला. बंगळुरूच्या पार्थिव पटेलला दुहेरी धावा करता आल्या आणि उर्वरित दहा फलंदाज एकेरी धावेत माघारी परतले. चेन्नईने 17.4 षटकांत 71 धावा करताना विजयी सलामी दिली. अंबाती रायुडूने 42 चेंडूंत 28 धावा केल्या.