IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयावर नाराजी प्रकट करत मैदानावर धाव घेतली होती. त्याच्या या कृत्यावर माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती आणि धोनी चुकीचा पायंडा पाडत असल्याचे मत व्यक्त केले. या कृत्यामुळे धोनीला सामना शुल्कातील 50 टक्के रक्कम दंड भरण्याची शिक्षाही सुनावण्यात आली. धोनीच्या विरोधातील सूर वाढत असताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली धोनीच्या मदतीला धावला. आपण सर्व माणूस आहोत, असे मत व्यक्त करताना दादाने धोनीची पाठराखण केली. गांगुली म्हणाला,''आपण सर्व माणूस आहोत. तो एक उत्तम प्रतिस्पर्धक आहे आणि हीच गोष्ट उल्लेखनीय आहे.''
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रुद्रावतार पाहायला मिळाला. कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या धोनीला असे वागताना पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या, अनेकांना तर स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. सामन्यात अखेरच्या षटकात तिसरा चेंडू बेन स्टोक्सने फुलटॉस टाकला आणि पंचांचा हात नो बॉलच्या इशाऱ्याकडे गेला. मात्र पंचांनी हात आखडता घेत नो बॉलचा निर्णय मागे घेतला. यामुळे मैदानाबाहेर उभा असलेला धोनी मैदानात घुसत पंचांना या कृतीचा जाब विचारला. चेन्नईला तीन चेंडूंत 6 धावांची गरज होती. यावेळी स्टोक्सने फुलटॉस चेंडू टाकला. यामुळे पंचांनी नो बॉलची खून केली. मात्र, दुसऱ्या पंचांनी यास नकार देताच त्यांनी हात मागे घेतला. धोनी क्लीन बोल्ड होऊन नुकताच मैदानाबाहेर गेला होता.
गांगुली हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार आहे आणि त्याच्या संघाने शुक्रवारी इडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. याबाबत गांगुली म्हणाला,''कोलकातासारख्या तगड्या संघाला दोन वेळा नमवणे, ही खूप उल्लेखनीय बाब आहे. संघाच्या कामगिरीवर मी समाधानी आहे. इडन गार्डनवरील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. हा देशातील सर्वोत्तम मैदान आहे. ''
शिखर धवन आणि रिषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्सला परतीच्या लढतीतही दिल्लीला नमवता आले नाही. विजयासाठीचे 179 धावांचे लक्ष्य दिल्लीने 7 विकेट राखून पार केले. धवनने 63 चेंडूत 11 चौकार व 2 षटकार खेचत नाबाद 97 धावा केल्या.