चेन्नई, आयपीएल 2019 : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली असताना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) खेळत असलेल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना पुरेशी विश्रांती घेण्याची काळजी सर्वच संघ घेत आहेत. त्यामुळे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आदी संघातील काही खेळाडू मायदेशासाठी रवाना झाले आहेत, तर येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र, भारतीय संघातील खेळाडूंना अद्याप विश्रांतीबाबत कोणताच संघ स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. त्याचा फटका भारताच्या वर्ल्ड कप मोहीमेला बसण्याची भीती वाटू लागली आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या वक्तव्याने भर पडली आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा हे आजारी असल्याची माहिती त्यांनी दिली.
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यात धोनी व जडेजा यांना विश्रांती देण्यात आली होती. ताप आल्यामुळे धोनीनं या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. धोनी व जडेजाच्या अनुपस्थितीचा फटका चेन्नईला बसला. मुंबईने 46 धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत फ्लेमिंग म्हणाला,''धोनी व जडेजा दोघेही आजारी आहेत. अनेक संघांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.''
धोनीच्या अनुपस्थितीने संघात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मतही फ्लेमिंग यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,''धोनी हा सर्वोत्तम खेळाडू आणि कर्णधार आहे. गेल्या अनेक वर्षांत तो सातत्याने खेळत आहे. तो संघात असल्यावर अन्य खेळाडूंवरील दडपण आपोआप कमी होतं. त्यामुळे असा खेळाडू संघाबाहेर असतो तेव्हा मोठी पोकळी निर्माण होते. धोनीच्या अनुपस्थितीत खेळलेल्या दोन्ही सामन्यांत आम्हाला हार पत्करावी लागली. तो संघात असल्यावर वातावरण वेगळेच असते''
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने शुक्रवारी चेन्नईवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी ताप आल्यामुळे खेळला नव्हता. या सामन्यात चेन्नईला धोनीची उणीव प्रकर्षाने जाणवली. 155 धावांचे माफक लक्ष्यही चेन्नईच्या संघाला पार करता आलेले नाही. चेन्नईचे दिग्गज फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. मुंबई इंडियन्सने हा सामना 46 धावांनी जिंकला.
Web Title: IPL 2019: MS Dhoni, Ravindra Jadeja pretty sick, both are unwell, says Stephen Fleming
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.