चेन्नई, आयपीएल 2019 : महेंद्रसिंग धोनी हा महान क्रिकेटपटू आहे, ते सर्वांनाच सुपरिचीत आहे. पण धोनी तब्बल दोन पिढ्यांबरोबर क्रिकेट खेळला असून त्याने बाप-लेकाची विकेट काढल्याची बाब आता पुढे आली आहे.
यंदा आयपीएलचा बारावा हंगाम सुरु आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक सामना झाला. या सामन्यानंतर धोनीने एका बाप-लेकाच्या जोडीला बाद केल्याची बाब पुढे आली आहे. या सामन्या धोनीने रायन पराग या राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला बाद केले. त्यावेळी हर्षा भोगले हे समाचोलन करत होते आणि त्यांनी याबाबत एक कमालीची गोष्ट सर्वांपुढे आणली आहे.
समालोचन करत असताना हर्षा भोगले यांनी जी माहिती दिली, ती ऐकून साऱ्यांनाच धक्का बसला. भोगले यावेळी म्हणाले की, " या सामन्यात धोनीने रायन परागला बाद केले आहे. यापूर्वी जेव्हा धोनी रणजी क्रिकेट स्पर्धा खेळत होता. त्यावेळी धोनीने रायनचे वडिल पराग दास यांनाही बाद केले होते."
धोनीने 1999-2000 या हंगानात बिहारकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले होते. या धोनीने इस्ट झोनच्या लीगमध्ये आसामविरुद्ध सामना खेळला होता. या सामन्याच्या दुसऱ्या डावात धोनीने रायनचे वडिल पराग यांना यष्टीचीत केले होते. दास यांनी या सामन्यात 24 चेंडूंत 30 धावा बनवल्या होत्या. हा सामना बिहारच्या संघाने 191 धावांनी जिंकला होता.