बंगळुरु, आयपीएल 2019 : अटीतटीच्या लढतीत अखेर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर बाजी मारली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने सहा धावांनी विजय मिळवला. मुंबईने बंगळुरुपुढे 188 धावांचे आव्हान ठेवले होते. एबी डि'व्हिलियर्स खेळपट्टीवर उभा असताना बंगळुरु हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण मलिंगाने अखेरच्या षटकात भेदक मारा केला आणि संघाला विजय मिळवून दिला.
बंगळुरुची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पण कर्णधार विराट कोहलीने 46 धावा करत संघाची गाडी रुळावर आणली. त्यानंतर एबी डि'व्हिलियर्सने तुफानी फटकेबाजी करत 41 चेंडूंत नाबाद 70 धावांची खेळी सकारली, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. या गोष्टीचा फटका मुंबईला बसला आणि त्यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात त्यांना 187 धावा करता आल्या. युजवेंद्र चहलने यावेळी चार विकेट्स मिळवत मुंबईच्या धावसंख्येला वेसण घातले. हार्दिक पंड्याने 14 चेंडूंत नाबाद 34 धावांची खेळी साकारल्यामुळे मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात आली.
मुंबईची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा आणि क्विंटन डी' कॉक यांनी मुंबईला अर्धशतकी सलामी दिली. पण सातव्या षटकात चुकीचा फटका मारण्याच्या नादात क्विंटन बाद झाला. त्यानंतर रोहितलाही जास्त काळ तग धरता आला नाही. रोहितचे अर्धशतक यावेळी फक्त दोन धावांनी हुकले. रोहितने 33 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 48 धावा केल्या. रोहितनंतर युवराज सिंगने धडाकेबाज फटकेबाजी केली. युवराजने युजवेंद्र चहलच्या 14व्या षटकाच्या पहिल्या तिन्ही चेंडूंवर षटकार लगावले. पण चौथ्या चेंडूवर मात्र युवराज बाद झाला. सूर्यकुमार यादवने गोलंदाजीचा काहीसा प्रतिकार केला, पण त्यालाही अर्धशतकाची वेस ओलांडता आली नाही. सूर्यकुमारसह चार फलंदाज फक्त पाच धावांमध्ये तंबूत परतले. या चार फलंदाजांमध्ये सूर्यकुमारसह किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या आणि मिचेल मॅक्लेघन यांचा समावेश होता.
विराट कोहलीच्या पाच हजार धावा पूर्ण
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली 46 धावांवर बाद झाला. विराटचे अर्धशतक यावेळी चार धावांनी हुकले. पण विराटने या सामन्यात आयपीएलमधील पाच हजार धावा पूर्ण केल्या.
यंदाचा आयपीएलचा हंगाम सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना की कोहली, कोण पाच हजार धावा पूर्ण करणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती. पण रैनाने पहिल्याच सामन्यात पाच हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर आयपीएलमध्ये पाच हजार धावा करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला.
Web Title: IPL 2019: Mumbai Indians finally win the match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.