हैदराबाद, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक फॅन फॉलोअर्स असलेले संघ. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तर CSK-MI या सामन्याची तुलना ' EL Classico' अशी करतो. स्पॅनिश फुटबॉल लीगमधील बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद यांच्यातील सामन्याला El Classico हा ( सर्वोत्कृष्ट लढत) असा दर्जा मिळाला आहे. रोहितलाही चेन्नई-मुंबईचा सामना असाच वाटतो. आता तर अंतिम सामन्यात हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे उद्याचा रविवार हा El Classico Sunday म्हणून चर्चेत आहे.
मुंबई इंडियन्स या कट्टर प्रतिस्पर्धीविरुद्ध सामना करण्यासाठी चेन्नईचे खेळाडू सज्ज झाले आहेत. क्वालिफायर २ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला नमवून चेन्नईने आठव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या लढतीपूर्वी चेन्नईच्या हरभजन सिंग आणि ड्वेन ब्राव्हो यांनी मुंबईला आव्हान दिले आहे. क्वालिफायर २ मध्ये चेन्नईने ६ विकेट्स राखून दिल्लीचा पराभव केला. १४८ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना फॅफ ड्यू प्लेसिस आणि शेव वॉटसन यांनी अर्धशतकी खेळी करून चेन्नईचा विजय पक्का केला.
या सामन्यानंतर भज्जी आणि ब्राव्हो यांनी मुंबई सज्ज राहण्याचे आव्हान दिले आहे. ब्राव्हो म्हणाला,"मुंबई आणि चेन्नई हे आयपीएलमधील दोन सर्वोत्तम संघ आहेत. त्यामुळे त्यांच्यातील सामना नेहमी चुरशीचा झालेला आहे. यंदा आम्हाला त्यांच्याकडून तीनही सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी फायनल्ससाठी आम्ही सज्ज आहोत. भेटू हैदराबादमध्ये, आम्ही येतोय."