बंगळुरु, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. या गोष्टीचा फटका मुंबईला बसला आणि त्यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात त्यांना 187 धावा करता आल्या. युजवेंद्र चहलने यावेळी चार विकेट्स मिळवत मुंबईच्या धावसंख्येला वेसण घातले. हार्दिक पंड्याने 14 चेंडूंत नाबाद 34 धावांची खेळी साकारल्यामुळे मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात आली.
मुंबईची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा आणि क्विंटन डी' कॉक यांनी मुंबईला अर्धशतकी सलामी दिली. पण सातव्या षटकात चुकीचा फटका मारण्याच्या नादात क्विंटन बाद झाला. त्यानंतर रोहितलाही जास्त काळ तग धरता आला नाही. रोहितचे अर्धशतक यावेळी फक्त दोन धावांनी हुकले. रोहितने 33 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 48 धावा केल्या. रोहितनंतर युवराज सिंगने धडाकेबाज फटकेबाजी केली. युवराजने युजवेंद्र चहलच्या 14व्या षटकाच्या पहिल्या तिन्ही चेंडूंवर षटकार लगावले. पण चौथ्या चेंडूवर मात्र युवराज बाद झाला. सूर्यकुमार यादवने गोलंदाजीचा काहीसा प्रतिकार केला, पण त्यालाही अर्धशतकाची वेस ओलांडता आली नाही. सूर्यकुमारसह चार फलंदाज फक्त पाच धावांमध्ये तंबूत परतले. या चार फलंदाजांमध्ये सूर्यकुमारसह किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या आणि मिचेल मॅक्लेघन यांचा समावेश होता.