मुंबई, आयपीएल २०१९ : पोलार्ड... पोलार्ड... असा नाद वानखेडेवर घुमत होता. कारण मुंबई इंडियन्सचा कर्णधार किरॉन पोलार्डचे वादळ वानखेडे स्डेडियमवर आले होते. पोलार्डच्या या धडाकेबाज फटकेबाजीपुढे किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. पोलार्डच्या या दमदार खेळीच्या जोरावरच मुंबईला पंजाबवर विजय मिळवता आला आणि धावांच्या मॅरेथॉनमध्ये ते सरस ठरले. पोलार्डने ३१ चेंडूंत १० षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ८३ धावांची तुफानी खेळी साकारली. पोलार्डच्या या खेळीमुळेच मुंबईला पंजाबवर तीन विकेट्स राखून विजय मिळवता आला. या विजयासह मुंबईने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
पंजाबच्या १९८ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात आक्रमक झाली, पण आश्वासक झाली नाही. मुंबईचा या सामन्यातील कर्णधार किरॉन पोलार्डने मात्र सामन्यात चांगलेच रंग भरले. पोलार्डने २२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. पोलार्डने षटकारासह ५५ धावा पूर्ण केल्या.
वानखेडे स्टेडियमवर
किंग्ज इलेव्हन पंजाबच्याख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांचा फटकेबाजीचा भांगडा पाहायला मिळाला. गेल आणि राहुल यांच्यापुढे मुंबईच्या गोलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. जोरदार फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा फटकावल्या.
मुंबईने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या गोष्टीचा चांगलाच फायदा गेल आणि राहुल यांनी उचलला. गेलचे वादळ पुन्हा एकदा घोंगावल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईचे गोलंदाज काही काळ गेलच्या फटकेबाजीपुढे नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. गेलने ३६ चेंडूंमध्ये ६३ धावांची वादळी खेळी साकारली, यामध्ये तीन चौकार आणि सात चौकारांचा समावेश होता.
गेल बाद झाल्यावर राहुलने जोरदार फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. राहुलने ६४ चेंडूंमध्ये प्रत्येकी सहा चौकार आणि षटकाराच्या जोरावर नाबाद १०० धावा केल्या.
Web Title: IPL 2019: Mumbai Indians Kieron Pollard beat Kings XI Punjab with cracking innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.