मुंबई, आयपीएल २०१९ : वानखेडेवर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला ३७ धावांनी पराभूत केले. मुंबईचा हा आतापर्यंतच्या आयपीएलमधील शंभरावा विजय ठरला. यापूर्वी मुंबईने १७४ सामन्यांमध्ये ९९ विजय मिळवले होते. या सामन्यात मुंबईने विजयाचे शतक पूर्ण केले. दुसरीकडे या पराभवामुळे चेन्नईला गुणतालिकेतील अव्वल स्थान गमवावे लागले.
या सामन्यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबईने १७४ सामने खेळले होते. या १७४ सामन्यांमध्ये मुंबईला ७५ सामने गमवावले लागले होते, तर ९९ लढतींमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नईवर त्यांनी या लढतीत मात करत मुंबईने शंभरावा विजय साजरा केला.
आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मुंबईच्या नावावर आहेत, तर या यादीमध्ये चेन्नईचे दुसरा आणि सनरायझर्स हैदराबादचा तिसरा कॅमांक लागतो. आतापर्यंत चेन्नईच्या संघाने १५१ सामने खेळले आहे, यामध्ये त्यांना ९३ सामन्यांमध्ये विजय आणि ५६ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. हैदराबादच्या संघाने आतापर्यंत ९६ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना ५३ सामने जिंकता आले आहेत तर ४२ सामन्यांध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
आतापर्यंत धडाधड चालणारी चेन्नई एक्सप्रेस अखेर मुंबई इंडियन्सने रोखली. आतापर्यंत चेन्नईने तिन्ही सामन्यांत विजय मिळवला होता. पण चौथ्या सामन्यात त्यांना मुंबईने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १७० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 133 धावा करता आल्या. मुंबईने हा सामना ३७ धावांनी जिंकला. मुंबईकडून सुर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले, तर हार्दिक पंड्याने दमदार अष्टपैली कामिगरी केली. मुंबईचा हा दुसरा विजय, तर चेन्नईचा पहिला पराभव ठरला. मुंबईचा हा आयपीएलमधील शंभरावा विजय ठरला.
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. चेन्नईने पहिल्या दोन षटकांत आपले दोन्ही सलामीवीर गमावले. सुरेश रैनाचा अप्रतिम झेल किरॉन पोलार्डने पकडला. चेन्नईची ३ बाद ३३ अशी अवस्था होती. त्यानंतर धोनी आणि केदार जाधव यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. पण धोनीला यावेळी १२ धावांवर समाधान मानावे लागले. हार्दिक पंड्याने धोनीला बाद केले. धोनी बाद झाल्यावर केदारने आपले अर्धशतक झळकावले. पण ५८ धावांची खेळी साकारल्यावर केदार बाद झाला आणि चेन्नई पराभूत होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले.
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला, पण त्यांना आश्वासक सुरुवात करता आली नाही. क्विंटन डी'कॉकच्या रुपात मुंबईला पहिला धक्का बसला. क्विंटन डी'कॉकला चार धावा करता आल्या. त्यानंतर रोहित शर्माही काही वेळात बाद झाला, त्याने १३ धावा केल्या. .युवराज सिंगही यावेळी चार धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्या यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला सावरले. पंड्याने ३२ चेंडूंत ४२ धावा केल्या.